प्राची सोनवणे, नवी मुंबईएमआयडीसीसारख्या भागात जाऊन कचराकुंड्या पालथ्या घालायच्या. काच, कागद, पुठ्ठा, लोखंडी वस्तू, पत्रा या वस्तू गोळा करून भंगारच्या दुकानात विकायच्या आणि त्यातून मिळालेल्या पैशांमधून संसाराचा गाडा हाकायचा. कचरा नाही मिळाला तर तसंच घरी यायचं आणि उपाशीपोटी झोपायचं... कचरावेचक महिलांची ही व्यथा. ताई आता कचराच मिळत नाही, आम्ही जगायचं तरी कसं आणि पोराबाळांच्या भविष्याचं काय, अशी व्यथा तुर्भेच्या इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या कचरावेचक महिलांनी मांडली. तुर्भे एमआयडीसी परिसरात कचरा वेचणाऱ्या महिलांशी संवाद साधला असता रोजीरोटीसाठी उन्हातान्हात फिरून ५० ते १०० रुपये हाती येतात. महागाईमुळे या तुटपुंजा पगारात घर चालविणे अशक्य असल्याची खंत या कचरावेचक महिलांनी केली. सातशेहून अधिक महिला कचरा वेचण्याचे काम करून उदरनिर्वाह करीत असून, या महिलांच्या समस्यांकडे मात्र उघड्या डोळ््यांनी पाहिले जात नाही. महानगरपालिकेने ठेवलेले घंटागाडी चालक तसेच कंपन्यांमध्ये काम करणारे सुरक्षारक्षक पत्रे, लोखंडी वस्तू गोळा करून स्वत: हे भंगार विकत असल्याची तक्रार कचरावेचक महिलांनी केली. वयाची साठी-सत्तरी ओलांडलेल्या वृद्ध महिलादेखील सकाळी ८ वाजल्यापासून ते दुपारी तीनपर्यंत कचऱ्याच्या शोधात फिरतात. लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष, महानगरपालिका आयुक्त व घनकचरा विभागाकडून या महिलांना फक्त आश्वासने दिली जातात; मात्र प्रत्यक्षात आजवर एकाही महिलेला मदत मिळाली नसल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली.दिघा, रबाळे, इंदिरानगर, सारसोळे, जासई, उलवे या ठिकाणी असलेल्या कचरावेचक महिलांच्या समस्यांसाठी नवी मुंबईतील स्त्रीमुक्ती संघटनेच्या वतीने वेळोवेळी पाठपुरावा करूनही आजतागायत या महिलांकरिता ठोस उपाययोजना राबविल्या जात नसल्याचे नवी मुंबईच्या समन्वयक वृषाली मगदूम यांनी दिली. स्त्रीमुक्ती संघटनेच्या वतीने कचरावेचक महिलांकरिता जनजागृती मोहीम, कचरा व्यवस्थापन याविषयी मोहीम राबविली जात असून, महिलांच्या सर्वच समस्यांकरिता लढा दिला जात आहे. दोन वेळच्या जेवणासाठी ऊन, वारा, पाऊस याची कसलीच पर्वा न करता शहर स्वच्छ करण्यात खारीचा वाटा असलेल्या या महिलांच्या समस्यांकडे मात्र दुर्लक्ष केले जात असल्याचे दिसून येते. शहराच्या कचरा व्यवस्थापनात महत्त्वाचा वाटा असलेल्या या कचरावेचक महिलांच्या समस्या सोडविल्या तर नक्की या शहराची प्रगती होईल अशी प्रतिक्रिया स्त्री मुक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. या संघटनेच्या वतीने महिलांना संघटित करून प्रशिक्षण दिले जाते तसेच या महिलांच्या संसाराची घडी बसविण्यासाठी या संघटनेच्या वतीने विविध उपक्रम देखील राबविले जातात.
आयुष्याचाच झालाय कचरा !
By admin | Updated: March 14, 2016 02:02 IST