ठाणे : ठाणेकरांना योग्य त्या सोयी-सुविधा पुरविण्यात अपयशी ठरल्याने आणि उत्पन्न व खर्च यांचा ताळमेळ बसविता न आल्याने अखेर छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि मीनाताई ठाकरे परिचारिका प्रशिक्षण संस्था सरकारने ताब्यात घ्याव्यात यासाठी आता ठाणे महापालिकेनेच हालचाली सुरू केल्या आहेत. या संदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी येणार आहे. कळवा रुग्णालयात ५०० खाटांची सुविधा उपलब्ध असून, रोज दिवसाला ५००च्या आसपास रुग्ण बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येतात. त्याच्या दुसऱ्या मजल्यावरच राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालय आहे. परंतु, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या मानांकनाप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयासाठी स्वतंत्र इमारत असणे गरजेचे आहे, तशी सुविधा येथे नाही. याशिवाय या इमारतीसाठी अंदाजे ४० ते ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. येथे गॅलरी, लेक्चर हॉल नाही, ग्रंथालय, संगणक लॅबसाठी जागा कमी पडत आहे. प्रयोगशाळा व संशोधन प्रयोगशाळा नाहीत. म्युझियमसाठी जागा नाही. नियोजित सुपर स्पेशालिटी सेवेसाठीसुद्धा कार्डीआॅलॉजी, कार्डीओथोरॅसीक सर्जरी, पॅथ लॅब, युरॉलॉजी, युरोसर्जरी, इंडोक्रायनॉलॉजी, कॅन्सर व कॅन्सर सर्जरी आदींसाठी जागाच उपलब्ध नसल्याचे पालिकेचे म्हणणे आहे. दरम्यान, या दोन्हीसाठी सध्या १०३ कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
कळवा रुग्णालय जाणार सरकारकडे?
By admin | Updated: February 18, 2015 02:29 IST