मयूर तांबडे /लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीत ८७ अपक्षांनी २९ हजार मतांचा पल्ला गाठला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ८ हजार चारशे ५९ मते मिळाली. काही ठिकाणी अपक्षांच्या मतांमुळे राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवारांना पराभव स्वीकारावा लागला आहे.पनवेल महापालिकेच्या पहिल्याच निवडणुकीच्या सुरु वातीला अपक्ष उमेदवारांनी भल्याभल्यांना घाम फोडला. निवडणुकीत इच्छुक असलेल्या मात्र तिकीट न मिळाल्याने नाराज झालेल्या उमेदवारांनी अपक्ष म्हणून अर्ज भरला होता. यापैकी काही अपक्षांना थोपविण्यात पक्षाला यश आले होते. मात्र काहींनी निवडणूक लढवत अक्षरश: घाम फोडला. काही प्रभागात अपक्षांची मते निर्णायक ठरली. पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत ८७ अपक्ष उमेदवारांनी निवडणूक लढवली. यात प्रभाग क्र मांक ८ ड मधून रोहन पाटील यांना सर्वाधिक १ हजार ५५५ मते मिळाली. प्रभाग १८ ड मधून मधुकर पिसाळ यांना सर्वात कमी म्हणजेच १५ मते मिळाली. एकही अपक्ष निवडून आलेला नसला तरी देखील काहींच्या पराभवाला अपक्ष जबाबदार ठरला असल्याचे दिसून आले आहे. ८७ अपक्षांना एकूण २८ हजार ७५१ मते मिळाली, तर मनसेला केवळ ८ हजार चारशे ५९ मिळाली.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पनवेलमध्ये नवनिर्माण करण्याचा चंग बांधत खारघर, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कामोठे आदी परिसरात २५ उमेदवार रिंगणात उतरवले होते. मात्र या निवडणुकीत मनसेला केवळ ८ हजार ४५९ मते मिळाली. यात प्रभाग क्र मांक १५ ड मधील संतोष सरगर यांना सर्वाधिक ८१२ मते मिळाली तर प्रभाग ८ क मधील गिरीश तिवारी यांना सर्वात कमी ७० मते मिळाली. मनसेला देखील या निवडणुकीत यश मिळाले नाही त्यांचा या निवडणुकीत पराभव झाला. बच्चू कडू यांच्या प्रहार जनशक्ती पक्षाने आपले ४ उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यांना केवळ ३९३ मते मिळाली. प्रकाश आंबेडकर यांच्या भारिप बहुजन महासंघातर्फे २६ उमेदवारांना संधी देण्यात आली. त्यात त्यांना एकूण ४ हजार ४३० मते मिळाली. प्रभाग क्र मांक ४ ब मधील उमेदवार सुनीता सोनावणे यांना सर्वाधिक ३९८ मते मिळाली. बहुजन मुक्ती पार्टीने १२ ठिकाणी आपले उमेदवार निश्चित करत निवडणुकीत उतरविले. मात्र मतदारांनी त्यांना नाकारत केवळ १ हजार ४०८ मते मिळाली.पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत बसपा, संभाजी ब्रिगेड, राष्ट्रीय समाज पक्ष, बहुजन विकास आघाडी, अखिल भारतीय सेना, स्वाभिमानी पक्ष, धर्मराज्य पक्ष, बळीराजा पार्टी यांनी आपापले उमेदवाराना संधी दिली होती. मात्र त्यांना या निवडणुकीत फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. भारतीय जनता पार्टीला ५१ तर शेकाप आघाडीने २७ जागा जिंकल्या.
अपक्षांची २९ हजार मतांची उडी
By admin | Updated: May 30, 2017 06:24 IST