नवी मुंबई : महापालिकेकडून हॉटेल्स व चित्रपटगृहांच्या परवाना शुल्कात भरीव वाढ करण्यात आली आहे. आजतागायत उत्पन्नवाढीवर अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष झाले होते. परंतु त्यांना सूट दिल्याने अथवा वाढल्याने त्यांच्या व्यवसायावर परिणाम होणार नसल्याचे सांगत आयुक्तांनी सुचवलेल्या या शुल्क वाढीला स्थायी समितीने मंजुरी दिली.महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्याच्या उद्देशाने शहरातील हॉटेल व्यावसायिक, सलून व चित्रपटगृहे यांच्या परवाना शुल्कात भरीव वाढ करण्यात आली आहे. आजतागायत त्यांच्याकडून अत्यल्प परवाना शुल्क आकारले जात होते. कल्याण-डोंबिवली महापालिका, मीरा-भार्इंदर महापालिका तसेच ठाणे महापालिकेच्या तुलनेत नवी मुंबईत आकारले जाणारे परवाना शुल्क अत्यंत कमी होते. याचा परिणाम महापालिकेच्या उत्पन्नावर होत होता. उद्योजकांची भरभराट होत असताना पालिकेच्या तिजोरीत मात्र अपेक्षित तितकी भर पडत नव्हती. यामुळे महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील दुर्लक्षित उद्योजकांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्यानुसार हॉटेल्स, लॉजिंग/ बोर्डिंग, उपाहारगृहे, स्वीट मार्ट तसेच सलुन्स, स्पा व ब्युटीपार्लर यांच्या परवाना शुल्कात कमालीची वाढ केली आहे. आयुक्तांमार्फत शुल्कवाढीचा हा प्रस्ताव स्थायी समितीपुढे आला असता, सर्वमताने त्यास मंजुरी देण्यात आली. चौ. मी. क्षेत्रफळानुसार हे सुधारित परवाना शुल्क आकारले जाणार आहे. त्यानुसार शून्य ते २० चौ.मी. क्षेत्रफळाच्या हॉटेल्स व उपाहारगृहे यांचे शुल्क १५० रुपयांवरून ७५० रुपये झाले आहे. तर २० ते ५० चौ.मी. क्षेत्रफळासाठी २२५ ऐवजी ११२५, ५० ते १०० चौ.मी. क्षेत्रफळासाठी ३७५ ऐवजी १८७५, १०० ते १५० चौ.मी. क्षेत्रफळासाठी ५२५ ऐवजी २,६२५ व त्यापुढील प्रत्येक ५० चौ.मी, करिता १५० ऐवजी ७५० रुपये परवाना शुल्क करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सलुन्स, स्पा व ब्युटीपार्लर यांच्यासाठी किमान ७० रुपयांऐवजी ३५० रुपये, तर १०० चौ.मी.पेक्षा जास्त क्षेत्रफळासाठी ५६५ ऐवजी २८२५ रुपये परवाना शुल्क लागू करण्यात आले आहे.त्याबरोबरच सिनेमागृहांच्या शो टॅक्स दरामध्ये देखील वाढ करण्यात आली आहे. महापालिका क्षेत्रातील चित्रपटगृहांकडून प्रति शो २० रुपये कर आकारला जात होता. सन १९९४ पासून त्यात महापालिकेने वाढ केलेली नव्हती. मुंबईत ६० रुपये, कल्याण-डोंबिवलीत १०० रुपये, ठाण्यात ५५ रुपये तर पुण्यात १०० रुपये शो टॅक्स आकारला जात असताना नवी मुंबईत मात्र प्रशासनाने या शुल्कवाढीकडे लक्ष दिले नव्हते. (प्रतिनिधी)
हॉटेल्सच्या परवाना शुल्कात वाढ
By admin | Updated: June 16, 2016 01:14 IST