नियोजनशून्य कामामुळे रहिवाशांची गैरसोय; स्मार्ट व्हिलेजअंतर्गत विकासकामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 11:38 PM2020-07-20T23:38:12+5:302020-07-20T23:38:25+5:30

घोटकॅम्पकडे मार्गक्रमण करण्यासाठी रस्तेच नसल्याची तक्रार

Inconvenience to residents due to unplanned work; Development work under Smart Village | नियोजनशून्य कामामुळे रहिवाशांची गैरसोय; स्मार्ट व्हिलेजअंतर्गत विकासकामे

नियोजनशून्य कामामुळे रहिवाशांची गैरसोय; स्मार्ट व्हिलेजअंतर्गत विकासकामे

googlenewsNext

पनवेल : महानगरपालिका हद्दीत घोटकॅम्प (कोयनावेळे) या ठिकाणी पालिका प्रशासनाच्या माध्यमातून स्मार्ट व्हिलेजअंतर्गत विविध विकासकामे हाती घेण्यात आली आहेत. मात्र, ही कामे करताना नियोजनाचा मोठा अभाव सध्याच्या घडीला या ठिकाणी दिसून येत असल्याने, त्या ठिकाणच्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे. गावात ये-जा करताना, या दुरवस्था झालेल्या रस्त्यांचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.

गावात भुयारी गटारे, रस्ते काँक्रिटीकरण करण्याचे काम पालिकेमार्फत सुरू करण्यात आले आहे. मात्र, कंत्राटदाराने पावसाळ्याच्या तोंडावर सर्व रस्ते खोदून ठेवल्याने, तसेच अर्धवट भुयारी गटारे उभारल्याने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाणी साचले आहे. विशेष गटारांचे काम अद्याप पूर्णत्वास आले नसल्याने, गटारांवरील झाकणे अद्याप लागलेली नाहीत. अशा परिस्थितीत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने, गावाभोवती पाणी साचते, यामुळे या गटारांचा अंदाज येत नसल्याने, अनेक वाहने या गटारांच्या अर्धवट कामांमध्ये अडकली जात असल्याचे येथील रहिवासी व कळंबोली मनसे चिटणीस प्रशांत कदम यांचे म्हणणे आहे. विकासकामांना आमचा विरोध नाही. मात्र, ती करताना योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे असल्याचे कदम यांचे म्हणणे आहे.

विशेषत: या ठिकाणी कामे करताना टप्पाटप्प्याने एक-एक काम करणे गरजेचे असताना, सर्वच्या सर्व रस्ते खोदलेले असल्याने, गावाबाहेर जाताना अथवा गावात येताना घोटकॅम्प (कोयनावेळे) रहिवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे. सध्याच्या कोविडच्या काळात अत्यावश्यक परिस्थिती उद्भवल्यास रुग्णवाहिकाही या ठिकाणी येऊ शकणार नसल्याचे प्रशांत कदम यांचे म्हणणे आहे.
पालिकेने याकरिता तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना राबविण्याची मागणी येथील ग्रामस्थ करीत आहेत. सर्वत्र रस्त्यात पसरलेल्या चिखलामुळेही वाहने या रस्त्यात रुतत आहेत, अशी येथील रहिवाशांची तक्रार आहे.

गावाचा सर्वांगीण विकास या अनुषंगानेचे स्मार्ट व्हिलेजची कामे घोटकॅम्प या ठिकाणी सुरू करण्यात येत आहेत. पावसाळ्यात या समस्या निर्माण झाल्या आहेत. तरीही धोकादायक ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात उपाययोजना राबविण्याच्या सूचना कंत्राटदाराला दिल्या जातील.
- संजय कटेकर, शहर अभियंता, पनवेल महानगरपालिका

Web Title: Inconvenience to residents due to unplanned work; Development work under Smart Village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.