कांता हाबळे , नेरळकर्जत तालुक्यातील तहसील कार्यालयासह अनेक महत्त्वाच्या शासकीय इमारतींना गेल्या अनेक वर्षांपासून गळती लागली आहे. इमारतींची दुरुस्ती करण्याऐवजी कार्यालयांवर दरवर्षी प्लॅस्टिक टाकण्यात येते. इमारतींच्या दुरुस्तीची मागणी होऊनही बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. कर्जत तालुक्यातील तहसील कार्यालय, उपविभागीय कार्यालय, वनविभागीय कार्यालय, तलाठी कार्यालय या सर्व महत्त्वाच्या इमारतींची पावसात दुरवस्था झाली आहे. सामान्य नागरिक कामे करण्यासाठी याठिकाणी दररोज शेकडोंच्या संख्येने येतात. कर्जत शहरात मध्यवर्ती ठिकाणी ब्रिटिशकालीन तहसील कार्यालय आहे. अनेक वर्षांपासून कार्यरत कौलारू कार्यालयाला सध्या गळती लागली आहे. यावर प्लॅस्टिक टाकून गळती थांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. कर्जत पोलीस ठाण्यासमोर पोलीस उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालय असून या इमारतीचे छत गेली चार वर्षांपासून गळत असून यावरही प्लॅस्टिक टाकण्यात आले आहे. कर्जतमधील गुंडगे भागात वन विभागाचे कार्यालय असून हे कार्यालयही जीर्ण झाले असून या कार्यालयाच्या इमारतीवरही प्लॅस्टिक टाकण्यात येत आहे. वर्षानुवर्षे दुरवस्था झाली असली तरी कार्यालयांच्या डागडुजीकडे दुर्लक्ष होतअसून केवळ प्लॅस्टिक टाकण्यावरच समाधान मानले जात आहे. दर पावसाळ्यात सरकारी इमारतींच्या गळक्या छपराखाली बसून येथील कर्मचाऱ्यांना कागदपत्रे हाताळावी लागत आहेत. कर्जत तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. शेतीचे नुकसान झाल्यावर शेतकऱ्यांना मदतीसाठी तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांकडे धाव घ्यावी लागते. मात्र याठिकाणच्या कर्मचाऱ्यांनाच बसायला योग्य जागा नसल्याने कामे पूर्ण होण्यास विलंब लागतो. पावसापासून वाचण्यासाठी यंदा महसूल, वन विभाग व पोलीस ठाण्याने पिवळ्या व निळ्या रंगाच्या प्लॅस्टिकचे आवरण संपूर्ण कार्यालयाला घातले आहे. तालुक्यातील शासकीय इमारतींच्या देखभालीची जबाबदारी कर्जत सार्वजनिक बांधकाम विभागाची आहे. परंतु वेळोवेळी बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून व पत्रव्यवहार करूनही याकडे दुर्लक्ष होत आहे.
सरकारी कार्यालये पावसाने बेजार
By admin | Updated: July 15, 2016 01:34 IST