दिघ्यातील पदपथ बनले गोडाऊन, कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2019 12:32 AM2019-12-01T00:32:01+5:302019-12-01T00:32:11+5:30

शहरातील अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेसह सिडको व एमआयडीसी प्रशासनही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे.

Godown, Goddess becomes a pathway to ignore action | दिघ्यातील पदपथ बनले गोडाऊन, कारवाईकडे दुर्लक्ष

दिघ्यातील पदपथ बनले गोडाऊन, कारवाईकडे दुर्लक्ष

Next

नवी मुंबई : दिघा परिसरातील पदपथ अतिक्रमणांच्या विळख्यात जात असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पदपथांवर व्यावसायिकांचे साहित्य साठवले जात असल्याने पदपथांचे नुकसान होत असून, पादचाऱ्यांचीही गैरसोय होत आहे. यानंतरही अशा अतिक्रमणांवर पालिकेकडून कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने अधिकाऱ्यांच्या भूमिकेविषयी संताप व्यक्त होत आहे.
शहरातील अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यात महापालिकेसह सिडको व एमआयडीसी प्रशासनही अपयशी ठरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे रस्ते, पदपथ तसेच मोकळे भूखंड अतिक्रमणांच्या विळख्यात सापडले जात आहेत, असे भूखंड लाटणाºया भूमाफियांच्या टोळ्या शहरात सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून मोकळ्या भूखंडावर झोपडी उभारून अथवा इतर प्रकारे अतिक्रमण करून ते हडपले जात आहेत. त्यात व्यावसायिकांचाही सहभाग दिसून येत आहे. व्यावसायिक जागेव्यतिरिक्त परिसरातील इतरही मोकळ्या जागांवर त्यांचे साहित्य मांडून त्या बळकावल्या जात आहेत. बळकावल्या जाणाºया जागांमध्ये पदपथांचाही समावेश दिसून येत आहे. व्यावसायिकांच्या छोट्या-मोठ्या साहित्यांसह टाकाऊ वस्तू पदपथांवर साठवल्या जात आहेत. हे साहित्य कित्येक महिने त्या ठिकाणी पडून राहत असल्याने शिवाय क्षमतेपेक्षा जास्त भार पडल्याने तिथले पदपथ खचत आहेत. यामुळे नागरिकांच्या सुविधांसाठी लाखो रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या पदपथांचे नुकसान होत आहे. असाच प्रकार दिघा येथील गणपतीपाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच त्या ठिकाणी आगीचीही घटना घडली होती. अगदी पेट्रोलपंपाला लागूनही अतिक्रमण केले जात आहे. त्यामुळे एखादी आगीची दुर्घटना घडल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात; परंतु अशा अतिक्रमणांवर कारवाईच्या बाबतीत संबंधित सर्वच प्रशासन निष्काळजीपणा करत असल्याचा संताप स्थानिकांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे एका व्यावसायिकाच्या अतिक्रमणाला मिळालेले अभय पाहून इतरही व्यावसायिक पदपथांवर अतिक्रमण करू लागले आहेत. वेळीच या परिस्थितीवर नियंत्रण न मिळवल्यास संपूर्ण परिसरातील मोकळ्या जागा व पदपथ अतिक्रमणाच्या विळख्यात जाण्याची भीतीही व्यक्त होत आहे.

Web Title: Godown, Goddess becomes a pathway to ignore action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.