मुंबई : पावसाळ्य़ात पदपथांवर तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात येणा:या झोपडय़ांवर पालिकेने कारवाई करू नये, अशी मागणी करीत सोमवारी शहरातील शेकडो बेघर रहिवाशांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. त्यानंतर बेघर रहिवाशांच्या शिष्टमंडळाने पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय देशमुख यांची भेट घेतली. त्यात पालिका आयुक्त सीताराम कुंटे यांच्यासोबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेण्याचे आश्वासन देशमुख यांनी दिले आहे.
पावसाळ्य़ात उघडय़ावर झोपल्यामुळे बेघर रहिवाशांना अनेक आजारांना सामोरे जावे लागते, असे बेघर अधिकार अभियानचे अध्यक्ष ब्रिजेश आर्य यांनी सांगितले. आर्य यांच्या म्हणण्यानुसार, मुंबईत 3 लाख बेघर पदपथावर राहतात. हिवाळा आणि उन्हाळ्य़ात उघडय़ावर राहणारे बेघर रहिवासी पावसापासून संरक्षण होण्यासाठी झोपडय़ा बांधतात. प्लास्टिक किंवा ताडपत्रीचा वापर करून उभारलेल्या या झोपडय़ाही तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. त्यात कोणतेही पक्के बांधकाम केलेले नसते. चार वर्षापूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने बेघरांसाठी 1 लाख लोकसंख्येमागे 1 शेल्टर (रात्र निवारा) बांधण्याचे आदेश पालिकेला दिले आहेत. मात्र त्याचे पालन मुंबई पालिका करताना दिसत नाही. परिणामी बेघरांसाठी शेल्टर उभारता येत नसेल तर पालिकेने बेघरांनी स्वत:साठी उभारलेल्या झोपडय़ा तरी तोडू नये, अशी मागणी आर्य यांनी केली आहे. (प्रतिनिधी)
शिवाय पावसाळ्य़ात पालिकेने कारवाई केल्यास येत्या महिनाभरात मंत्रलयाला घेराव घालण्याचा इशाराही आर्य यांनी दिला आहे.