पनवेल : अमेरिकन डॉलर कमी दरात देतो असे सांगून अंतिम व्यवहाराच्या वेळी रुमालात डॉलरच्या बदल्यात खोटे कागद बांधून देऊन संबंधित व्यक्तीकडील रोख रक्कम काढून घेऊन पसार होत असल्याचे प्रकार पनवेलमध्ये घडले होते. दिल्लीतील चार ठग अशी फसवणूक करत असल्याची माहिती मिळताच त्यानुसार सापळा रचून या चौकडीला पनवेल शहर पोलिसांनी गजाआड केले.प्रदीप चंद्रसेन अग्रवाल यांना आरोपी शाहिद दाऊद काझी (३७, सध्या रा. चिपळे गाव, मूळगाव नवी सीमापुरी, जुनी दिल्ली), मासूम आतीक शहाजी (३०, रा. चिपळे गाव), इस्माईल खालील खान (२०, रा. चिपळे गाव) व नूर जब्बर माथूर (३७, रा. चिपळे गाव) यांनी आमच्याकडे २ हजार रूपये किमतीचे अमेरिकन डॉलर असून ते आम्ही तुला देऊ, त्या बदल्यात तू आम्हाला ६० हजार रूपये दे असे सांगून त्याला पनवेल बस डेपोसमोरील ब्रीजखाली बोलावले. या घटनेची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्यात समजताच गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, मनीष कोल्हटकर, पोलीस हवालदार चौधरी, कोळी, पोलीस नाईक घाडगे, चौधरी आदींच्या पथकाने त्याठिकाणी सापळा रचला असता आरोपी हे फिर्यादीकडून रोख रक्कम घेऊन त्याला अमेरिकन डॉलर न देता रुमालात खोटे कागद बांधून देऊन फसवणूक करीत असताना आढळले, ताबडतोब पोलिसांनी या चौघांनाही पकडले. याबाबत पुढील तपास गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे करीत आहेत. (वार्ताहर)
फसवणूक करणाऱ्या चौघांना अटक
By admin | Updated: May 24, 2016 01:59 IST