प्राची सोनवणे, नवी मुंबईसण असो उत्सव तरुणींना नटण्याथटण्यासाठी असलेली ही एक उत्तम संधी आहे. सौंदर्यात भर टाकणाऱ्या ट्रेण्डी नेल आर्ट्सलाही तरुणींनी मोठ्या प्रमाणात पसंती दाखविली आहे. शहरातील बाजारपेठा, मॉल्स या ठिकाणी खास मेहंदी आर्टिस्ट शहरात दाखल झाले आहेत. सौंदर्यात भर पाडणाऱ्या मेहंदी, नेल आर्ट्सलाही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. नखांवर नेलपेंट लावण्याची फॅशन आता बदलली असून, प्रत्येक दिवशी पोशाखाला मॅचिंग असे नेल आर्ट करण्याची भन्नाट फॅशन लोकप्रिय होत आहे. सोनेरी, चंदेरी, आॅक्साइड रंगांची नेल आर्ट मोठ्या प्रमाणात लोकप्रिय झाली आहे. घरच्या घरी करता येणारी ही नेल आर्ट नखांचे सौंदर्य वाढवून एक ग्लॅमरस लूक देते. त्यामुळे बाजारामध्ये नव्याने आलेली आकर्षक रंगसंगती, नखांवर नेल आर्ट केलेली कृत्रिम नखे, विविध रंगांच्या चमकी, तसेच नेल आर्ट वर्कशॉप्सने तरुणींना भुरळ पाडली आहे. आर्टिफिशियल नेल टेक्नॉलॉजीला शहरामध्ये मोठी मागणी असून मॉल्स, ब्युटीपार्लर्समध्ये मोठ्या प्रमाणात नेल आर्टिस्ट पाहायला मिळतात. वेगवेगळ््या डिझाइन्स, स्टोन्स, चमकी, तारे, मोती लावून नखांना सजविण्यात येते. नखांना सजविण्याच्या या प्रकारामुळे एक ट्रेण्डी लूक येतो. नखं सजविण्याच्या या फॅशनसाठी २०० ते ८०० रुपयांपर्यंत खर्च येतो. यासाठी बाजारात खास स्टिकर्सही उपलब्ध आहेत. शहरातील मॉल्स, महत्त्वाच्या बाजारपेठांमध्ये खास राजस्थानहून आलेल्या मेहंदी आर्टिस्टला मोठ्या प्रमाणात मागणी आहे. यासाठी ५००हून अधिक डिझाइन्स उपलब्ध असून, १०० रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंतचे भाव आकारले जातात. गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून मेहंदीच्या शिवणीसाठीही शहरातील ब्युटीपार्लर्समध्ये मोठ्या प्रमाणात महिलावर्गाने गर्दी केली आहे. स्वत: मेहंदी शिकून इतरांच्या हातावर नक्षी काढून त्यातून पैसे कमावण्यासाठी महिलावर्गाने नवनवे उपक्रम राबविले आहेत.
नेल आर्ट, मेहंदी डिझाइन्सवर भर
By admin | Updated: October 13, 2015 02:09 IST