अमुलकुमार जैन, बोर्ली-मांडलाफेब्रुवारी ते मे या चार महिन्यांत जंगलातील विविध फळेही बाजारात येत असतात. हा सर्व व्यवसाय मुरु ड तालुक्यासहित रायगड जिल्ह्यातील आदिवासी महिला करीत असतात. या वर्षीही रानमेवा काजूगर, रांजणे, करवंदे, जांभळे, काजू बाजारात दाखल झाले आहेत. ओले काजूगर पाचशे रु पये किलो तर काजूचा वाटा शंभर रुपये असा विकला जात आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांत काजूचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते; परंतु खवय्ये यांच्या बाजारात ओल्या काजूगरांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. मुरुड तालुक्यात पर्यटन वाढल्याने ओले काजूगर व करवंदे यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे फायदा होत असल्याचे भारत जंगम यांनी सांगितले. ओले काजूगर काढणीचा व्यवसाय रायगड जिल्ह्यातील आदिवासी मंडळीच करीत असतात. त्यामध्ये हा व्यवसाय करण्यासाठी ओल्या काजू बिया काढणे, सोलून त्यातील गर काढणे या मुख्य प्रकिया असतात. यासाठी पुरुष आणि कुटुंबातील मुले ओल्या काजू बिया झाडावरून काढतात. ओले काजूगर काढण्याची अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची यंत्रणा अस्तित्वात नाही, असे सुभाष ठाकूर यांनी सांगितले आहे. आंबा, काजू बी, करवंदे यासारखी रानातील फळे दिवसभर गोळा करायची अन् दुसऱ्या दिवशी किंवा त्याच दिवशी विकायची व येणाऱ्या पैशांवर आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करायचा, अशी परिस्थितीअसते. पावसाळ्यात शेतकऱ्यांकडे शेतीच्या कामाला तर कधी वीटभट्टीवर तर कधी मोलमजुरी तर कधी खाडीतील छोटी मासेमारी यावर आपल्या कुटुंबाची गुजराण करीत असतात. एकंदरीत काय तर आदिवासी बांधवांचे जीवन कष्टमय आहे.
रानमेवा बाजारात दाखल
By admin | Updated: March 17, 2017 05:50 IST