नवी मुंबई : पाच वर्षांत नवी मुंबई परिसरात ५५ हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यापैकी पंधरा हजार घरांचे बांधकाम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. सिडकोच्या विविध गृहप्रकल्पांची कामे केलेल्या बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन या कंपनीला नव्या गृहप्रकल्पाच्या उभारणीचे काम देण्यात आले आहे.नवी मुंबई क्षेत्रात विविध आर्थिक घटकांसाठी पुढील पाच वर्षांत ५५ हजार घरे बांधण्याचा निर्धार सिडकोने केला आहे. मागील दोन-तीन वर्षांत जवळपास पाच हजार घरे बांधण्यात आली आहेत. तर लवकरच १५ हजार १५२ घरांच्या बांधकामांना सुरुवात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, ही घरे घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा व द्रोणागिरी या नोडमध्ये बांधली जाणार आहेत. त्यासाठीच्या निविदा प्रक्रिया अलीकडेच पूर्ण करण्यात आल्या आहेत. पुढील तीन वर्षांत हे गृहप्रकल्प उभारले जाणार आहेत. एकाच वेळी पाचही नोडमधील गृहप्रकल्पाला सुरुवात केली जाणार आहे. कामाला सुरुवात झाल्यानंतर घरांच्या विक्रीसाठी अर्ज काढले जाणार आहेत. नव्याने बांधण्यात येणाऱ्या १५ हजार घरांच्या प्रकल्पात तळोजा नोडमध्ये ४२७५ तर घणसोलीत १५३२ घरांचा समावेश असणार आहे. कळंबोली आणि द्रोणागिरी नोडमधील गृहप्रकल्पात अनुक्रमे ९१४ आणि २५२७ घरांचा समावेश असेल. दिवाळीपर्यंत या गृहप्रकल्पाच्या कामाला सुरुवात होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाने व्यक्त केला आहे.
सिडकोची पंधरा हजार नवीन घरे
By admin | Updated: March 10, 2017 04:27 IST