अलिबाग : इंग्रजीमधील संपूर्ण भारतीय संविधान अगदी प्रास्ताविका, अनुक्रमणिकेपासून त्यातील २२ प्रकरणे, ३९५ कलमे, त्यांची उपकलमे, परिशिष्ठे अणि अनुसूचीच्या काही दुरुस्त्या तोंडपाठ करून सलग एक तास १० मिनिटांत सांगून तिने साऱ्यांनाच थक्क केले. ‘संविधानकन्या’ असा नावलौकिक संपादन केलेल्या अवघ्या १२ वर्षांची इयत्ता सातवीत शिकणारी मनश्री संतोष आंबेतकर हिने रविवारी आपल्या या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्याची आगळी प्रचिती ‘लोकमत’ कार्यालयात दाखवून उपस्थितांना थक्क केले.यावेळी अलिबाग पोलीस ठाण्याच्या वतीने अलिबागचे पोलीस निरीक्षक सुरेळ वराडे यांनी मनश्री हीस पुष्पगुच्छ देऊन गौरव केला आणि पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. रविवारी ‘लोकमत’मध्ये मनश्रीच्या कर्तृत्वाचे वृत्त वाचताच खरंतर मला तिला शुभेच्छा देण्याची मनस्वी तीव्र इच्छा होती. आज ‘लोकमत’ कार्यालयात ती पूर्ण झाली, याचाही एक आनंद झाल्याचे वराडे यांनी यावेळी सांगितले.‘लोकमत’ अलिबाग कार्यालयाचे व्यवस्थापक समीर कुलकर्णी यांनी ‘लोकमत’च्या वतीने संविधानकन्या मनश्रीला पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी मनश्रीचे वडील संतोष धर्मा आंबेतकर व लोकमत अलिबाग कार्यालयातील सर्व उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)
संविधानकन्या मनश्रीचा लोकमत कार्यालयात सत्कार
By admin | Updated: March 1, 2016 02:43 IST