- अंकुश मोरेवावोशी : ‘रोज मरे त्याला कोण रडे’ अशी अवस्था मुंबई पुणे द्रुतगती मार्गाची झाली आहे. आडोशी हद्दीत काही ठिकाणी लेन खचली असून, मार्ग अधिकच धोकादायक बनला आहे. भारतातील पहिला सहापदरी द्रुतगती मार्ग म्हणून मुंबई पुणे मार्ग ओळखला जात होता. सुरक्षित आणि जलद प्रवास या हेतून बांधण्यात आलेला मार्ग अपघात, लूटमार आणि वीकएण्डला वाहतूककोंडीमुळे जास्त चर्चेत आहे.मुंबईहून पुण्याकडे जाताना आडोशी हद्दीत दुसऱ्या आणि तिसऱ्या मार्गिकेत(लेन) रस्ता काही ठिकाणी खचला आहे. काँक्रिटचा खचलेला रस्ता वरखाली झाला असून, डांबर टाकून केलेली मलमपट्टी फारशी लागू पडलेली नाही. खचलेला भाग दबल्यामुळे काही ठिकाणी काँक्रिटवर आले आहे. वर आलेला रस्त्याचा भाग अतिशय धोकादायक स्थितीत आहे. पहिली मार्गिका अवजड वाहनासाठी तर दुसरी मार्गिका हलक्या वाहनासाठी असून, वेगात जाणाऱ्या वाहनाच्या टायरला फटका बसल्यास जीवघेण्या अपघातची शक्यता आहे. काँक्रिटवर डांबरचा थर देऊनही रस्ता खड्डे नजरेत भरत आहेत. वाहनचालकांकडून सक्तीने टोलवसुली करताना प्रवाशांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने मात्र हयगय होत आहे.वीस वर्षांनंतर द्रुतगती मार्गाचा दुरुस्तीचा ठेका पुन्हा आयआरबीला मिळाला आहे, परंतु आयआरबीकडून धोकादायक मार्गिका दुरुस्तीसाठी पाठपुरावा होणे आवश्यक असताना, गांभीर्याने दखल घेतली जात नाही.वीस वर्षांत सुरक्षेच्या दृष्टीने ठोस कामे द्रुतगती मार्गावर झाली नाहीत. टोलवाढ मात्र नियमित केली जाते. द्रुतगती मार्गावरून दररोज आयआरबी अभियंते ये-जा करतात त्यांची याबाबत उदासीनता अपघाताला आमंत्रण देत आहे. खचलेली मार्गिका पाहून वाहनचालक अचानक वेग कमी करतो आणि त्यामुळे पाठीमागून वेगात आलेले वाहन एकमेकांवर आपटून अपघाताच्या घटना घडतात.- प्रशांत पाटील, माहिती अधिकार कार्यकर्ताही दुरुस्ती सध्या जयहिंद कंत्राटदाराकडे आहे. वर्षभरापासून दुरुस्ती रखडलेली आहे. अधिक माहिती वरिष्ठ देतील.- भोईटे, आयआरबी अभियंता
द्रुतगती मार्ग धोकादायक, अनेक ठिकाणी खचली लेन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 01:13 IST