नवी मुंबई : रेल्वेत जागा न मिळाल्याने मुक्काम वाढल्याने तात्पुरता आश्रय दिलेल्या परराज्यातील व्यक्तींची जमावाने हकालपट्टी केल्याचा प्रकार सोमवारी रात्री वाशी गावात घडला. यामुळे काही वेळासाठी त्या ठिकाणी तणाव निर्माण झाला होता. अखेर पोलिसांनी स्थलांतरितांची इतरत्र सोय करून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.परराज्यातील व्यक्तींना त्यांच्या मूळ गावी पाठवण्याचे काम नवी मुंबई पोलिसांकडून गेल्या दहा दिवसांपासून सुरू आहे. प्रत्येक राज्यासाठी स्वतंत्र रेल्वेची सोय करून दोन्ही परिमंडळांमधील संबंधित राज्यांतील व्यक्तींना पाठवले जात आहे. दोन दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशमधील व्यक्तींना रेल्वेने पाठवले जाणार होते. याकरिता त्याच दिवशी संबंधित व्यक्तींना गावी जाण्याच्या तयारीतच प्रत्येक पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले होते. मात्र रेल्वेतील प्रवासी क्षमता संपल्याने वाशी पोलीस ठाणे हद्दीतील सुमारे शंभरहून अधिकांचा प्रवास रद्द करण्यात आला. तर त्यांना पुढच्या रेल्वेचे नियोजन होईपर्यंत पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले. मात्र सर्वजण भाडोत्री जागेत राहणारे असल्याने व गावी जाण्यासाठी घराचा ताबा सोडून आले होते. त्यापैकी बहुतांश कुटुंबे वाशी गावातील होती.काहींना पुन्हा वाढीव दिवसासाठी संबंधित घरमालकांनी घराचा ताबा दिला. परंतु आठ ते दहा कुटुंबांना घरमालकांनी तात्पुरता आसरा देण्यास नकार दिला. यामुळे पोलीस ठाण्यासमोरील मोकळ्या मैदानात त्यांनी ठाण मांडले होते. त्यात महिला व पुरुषांसह वृद्ध व्यक्ती व लहान मुलांचाही समावेश होता. नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत व वाशी पोलीस यांनी वाशी गावातीलच पालिका शाळेत त्यांच्या निवाऱ्याची तसेच अन्नपाण्याची सोय केली.मात्र सोमवारी रात्री वाशी गावातीलच काही व्यक्तींनी असहाय व बेघर असलेल्या कुटुंबीयांबद्दल परिसरात अफवा पसरवली. त्या व्यक्ती वाशी गावातीलच भाडोत्री राहिलेल्या असतानाही मुंबईवरून त्यांना आणल्याची तसेच त्यांना कोरोना झाल्याची अफवा पसरवली. त्यामुळे शाळेबाहेर दीडशे ते दोनशे जणांचा जमाव जमला. त्याची माहिती मिळताच वाशी पोलीस व दशरथ भगत यांनीही त्या ठिकाणी जाऊन आश्रय देण्यात आलेल्या व्यक्ती वाशी गावातल्याच असल्याचे सांगितले. परंतु जमावाने त्यांना शाळेतून हाकलण्याचा प्रयत्न केला. अखेर वाशी पोलिसांनी त्या सर्व परराज्यातील व्यक्तींना जमावाच्या तावडीतून सुरक्षित बाहेर काढले.मुंबईत येणारे लोंढे जाताहेत स्वगृहीमुंबई ही प्रत्येकाच्या हाताला काम देणारी नगरी आहे. मुंबईत आल्यावर काम मिळणारच अशी येथे येणाºया प्रत्येकाला खात्री असते. याच आशेवर मुंबईत परप्रांतीय मोठ्या संख्येने दाखल होतात. हाताला मिळेत ते काम हे लोक करतात.मात्र आज कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे आणि लॉकडाउनमुळे हाताला काम नसल्याने या परप्रांतीय कामगारांनी आपल्या राज्यात घरी जाण्यास सुरुवात के ली. ज्या प्रकारे हे लोंढे मुंबईत येत होते, तसेच आता स्वगृही परतत आहेत.अमानुष वर्तणूकवाशी गावातील प्रकारामुळे परिसरात काही वेळासाठी तणाव निर्माण झाला होता. कोरोनाच्या आडून काही व्यक्ती परराज्यातील व्यक्तींप्रति अमानुष वर्तणूक करीत असल्याचेही दिसून येत आहे.
वाशी निवारा केंद्रातून आश्रित परप्रांतीयांना हाकलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2020 06:45 IST