नवी मुंबई : वाशी सेक्टर १५ मध्ये रोडवर व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर पालिकेने कारवाई केली होती. परंतु कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी परप्रांतीय विक्रेत्यांनी पुन्हा येथील रस्ता अडविला असून, संबंधितांवर कडक कारवाईची मागणी केली जात आहे. महापालिकेने शहरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात जोरदार मोहीम सुरू केली आहे. वाशी सेक्टर ९ मध्ये जवळपास तीन दशकांपासून व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांनाही हटविण्यात आले आहे. येथील रस्ता मोकळा करण्यात आला आहे. शहरात इतरही ठिकाणी फेरीवाल्यांवर कारवाई सुरू आहे. वाशी सेक्टर १५ मधील रोडवरही अनधिकृत फेरीवाले भाजी व इतर वस्तूंची विक्री करीत असतात. पालिकेने या विक्रेत्यांवर अनेक वेळा कारवाई केली आहे. परंतु कारवाईनंतर दुसऱ्याच दिवशी पुन्हा अतिक्रमण झाले आहे. नागरीकांना ये - जा करण्यासही त्रास होत आहे. याशिवाय वाशी परिसरातील परवानाधारक भाजी विक्रेत्यांना पालिकेने शिवाजी चौकाजवळ जागा उपलब्ध करून दिली आहे. परंतु रोडवर अतिक्रमण केलेल्या फेरीवाल्यांमुळे ग्राहक तिकडे जात नाहीत. यामुळे पालिका प्रशासनाने अनधिकृत फेरीवाल्यांना तेथून हटविण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे. रोडवर पडणाऱ्या कचऱ्यामुळे नागरिकांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
वाशीत फेरीवाल्यांचे पुन्हा रोडवर अतिक्रमण
By admin | Updated: July 24, 2016 04:03 IST