नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रवेशद्वारांच्या बांधकामांवर करोडो रूपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. चार वर्षांनंतरही काम पूर्ण होवू शकले नाही. यापूर्वी ३ कोटी रूपयांच्या संगणकीकरणाच्या कामामध्येही घोटाळा होवूनही ठेकेदाराला व दोषी कर्मचाऱ्यांना पाठीशी घातले होते. त्याचपद्धतीने प्रवेशद्वाराचे काम करणाऱ्या ठेकेदारावर व संबंधित अभियंत्यांवर कोणतीच कारवाई केली जात नाही. बाजार समितीमध्ये संचालक मंडळाच्या कार्यकाळामध्ये सुरू झालेली बहुतांश कामे रखडली आहेत. यामध्ये प्रवेशद्वारांच्या कामांचाही समावेश आहे. २०१२ मध्ये जवळपास ४ कोटी रूपये खर्च करून भाजीपाला, फळ मार्केटमध्ये एकूण १० व धान्य मार्केटमध्ये ४ प्रवेशद्वार उभारण्याचे काम सुरू केले होते. २०१४ च्या सुरवातीलाच ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. परंतु काम करण्याची मुदत संपून दोन वर्षे झाल्यानंतरही एकही मार्केटमधील काम अद्याप पूर्ण होवू शकलेले नाही. प्रवेशद्वाराची रचना करताना त्यामध्ये सुरक्षा रक्षकांची केबिन, आवक व जावक गेटवर नोंदी ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कार्यालय, पहिल्या मजल्यावरही छोटेसे कार्यालय तयार करण्याचे निश्चित केले होते. गेटवरील सर्व कामे तिथल्या तिथेच व्हावीत. पाचही मार्केटची गेट आॅनलाइन पद्धतीने जोडण्याची संकल्पना मांडण्यात आली होती. परंतु एक वर्ष झाल्यानंतरही अनेक प्रवेशद्वारांचे प्लिंथपर्यंतचे कामही पूर्ण झाले नव्हते. चार वर्षात धीम्या गतीने काम सुरू आहे. सद्यस्थितीमध्ये फळ व भाजीमधील बांधकाम संपले आहे. परंतु प्रवेशद्वारावरील स्वागत कमान व इतर कामे अद्याप पूर्ण झालेली नाहीत. अद्याप बांधकामाचा ताबा बाजार समितीकडे दिलेला नाही. प्रवेशद्वारांची रचनाही चुकली असून विनाकारण त्यावर लाखो रूपयांचा खर्च झाल्याच्या तक्रारी व्यापारी करू लागले आहेत. भाजी व फळ मार्केटमधील प्रवेशद्वारांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले आहे. भाजी मार्केटच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या पहिल्या मजल्यावर मागील वर्षीच पावसाळ्यात पाणी गळू लागले होते. कार्यालयामध्ये अद्याप पाण्याचे ओघळ तसेच आहेत. प्रवेशद्वाराच्या बांधकामाला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. ठेकेदार काम करत असताना बाजार समितीच्या अभियंत्यांनी कधीच त्यावर लक्ष ठेवले नसल्याने काम दर्जेदारपणे झालेले नाही. अर्धवट अवस्थेत असलेल्या प्रवेशद्वाराच्या इमारतीमध्ये काही दिवसांपासून सुरक्षा रक्षकांचे कार्यालय सुरू केले आहे. इमारतीचा वापर सुरू झाल्यामुळे शिल्लक राहिलेले काम होणारच नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. धान्य मार्केटमध्येही चार ठिकाणी प्रवेशद्वार उभारले जाणार होते. त्यामधील दोन गेटचे काम धीम्या गतीने पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. उर्वरित दोन ठिकाणची कामे सद्यस्थितीमध्ये थांबविलेली आहेत. मसाला मार्केटमध्ये रोडच्या काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने प्रवेशद्वारांचे काम सुरूच केले नसल्याने बाजार समितीचे पैसे वाचले आहेत. या सर्व कामांची चौकशी करण्याची व दोषींवर कारवाईची मागणी होवू लागली आहे.
प्रवेशद्वारांवर उधळपट्टी
By admin | Updated: May 23, 2016 03:23 IST