नवी मुंबई : आरटीई प्रवेश प्रक्रियेंतर्गत नर्सरीसाठी प्रवेश मिळूनही तो नाकारणाऱ्या शाळेला शिक्षण अधिकाऱ्यांनी नोटीस बजावली आहे. सदर शाळेची तक्रार मनविसेतर्फे शिक्षण अधिकाऱ्यांकडे केली होती. संबंधित खासगी शाळेवर सक्त कारवाईची मागणी करत त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला होता.महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पाठपुराव्यानंतर नवी मुंबईतील खासगी शाळांमध्ये आरटीईअंतर्गत रिक्त असलेल्या जागांची माहिती उघड झालेली आहे. अशातच काही शाळांमध्ये दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे प्रवेश नाकारले जात असल्याचे समोर येत आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील ज्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी आॅनलाइन अर्ज केले होते, त्यांची ७ मार्चला प्रवेश यादी जाहीर झालेली आहे. यानुसार ज्या शाळेत पाल्याचा प्रवेश मिळाला आहे, अशा शाळांकडे पालक धाव घेत आहेत; परंतु प्रक्रियेत ५० जागा शिल्लक दाखवूनही डी.पी.एस. शाळेकडून पात्र पाल्यांना नर्सरीसाठी प्रवेश नाकारला जात होता. याची तक्रार मनविसे शहर अध्यक्ष सविनय म्हात्रे यांनी शिक्षण अधिकारी संदीप संगवी यांच्याकडे केली होती. नर्सरीऐवजी केवळ पहिलीच्या वर्गासाठीच जागा शिल्लक असल्याचेही शाळेकडून पालकांना सांगितले जात होते. यावरून खासगी शाळांवर शिक्षणाधिकाऱ्यांचा अंकुश राहिला नसल्याचा आरोप करत, प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम मुदतीपूर्वी संबंधित शाळेत विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला नाही, तर आंदोलनाचा इशाराही मनविसेतर्फे देण्यात आला होता. याची दखल घेत शिक्षण अधिकारी संदीप संगवी यांनी डी.पी.एस. शाळेला नोटीस बजावून आरटीई अंतर्गतच्या प्रवेशाचा अहवाल मागवला आहे. तसेच पात्र विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश न मिळाल्यास कारवाईचा इशाराही पत्राद्वारे देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
प्रवेश नाकारणाऱ्या शाळेला शिक्षणाधिकाऱ्यांची नोटीस
By admin | Updated: March 16, 2017 03:04 IST