पनवेल : कामोठे सेक्टर ५ मधील मारुती टॉवरच्या टेरेसवर सापडलेल्या ड्रोनबाबत विविध तर्कवितर्कांना उधाण आलेले दिसून येत आहे. हा ड्रोन नेमका कोठून आला, या मागचा उद्देश काय होता? याबाबत साशंकता निर्माण झाली आहे. ३ मार्च रोजी ही घटना उघडकीस आली असून, या प्रकरणाचा तपास अद्याप सुरु आहे एवढीच माहिती कामोठे पोलीस देत आहेत. देशभरात दहशतवादाचे सावट पसरले असून अनेक ठिकाणी सुरक्षा यंत्रणांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. विशेष म्हणजे पनवेलमधील कर्नाळा अभयारण्यात इसिसच्या आतंकवाद्यांनी रेकी केल्याचे समोर आले होते. त्यानंतर पोलीस उपायुक्त विश्वास पांढरे यांनी लोकप्रतिनिधींची बैठक बोलावून त्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या होत्या. कामोठेमध्ये सापडलेल्या ड्रोनबाबत स्पष्ट माहिती पुढे आली नसल्यामुळे याठिकाणचे रहिवासी देखील संभ्रमात आहेत. ड्रोनयामधील कॅमेऱ्यांची किंमत लाखोच्या घरात असल्याचे समजते. अशा प्रकारच्या ड्रोन वापरासाठी स्थानिक पोलीस ठाणे तसेच विविध प्रशासकीय परवानग्या घ्याव्या लागतात. कामोठेमधील मारुती टॉवरमधील ही घटना असून दि. ३ मार्च रोजी याठिकाणचे रहिवासी काही कामानिमित्त टेरेसवर गेले असता हा ड्रोन रहिवाशांना त्याठिकाणी आढळला. रहिवाशांनी तत्काळ ही माहिती कामोठे पोलिसांना दिली. (प्रतिनिधी)
कामोठेमध्ये सापडलेल्या ड्रोनबाबत साशंकता
By admin | Updated: March 12, 2016 02:20 IST