नवी मुंबई:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानाच्या पहिल्या टेकऑफची डेडलाइन हुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विमानाच्या उड्डाणासाठी आवश्यक असलेल्या विविध पात्रता चाचणी सिडकोने यशस्वीरीत्या पार केल्या असल्या तरी टर्मिनल इमारतीसह अत्यावश्यक कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. ती पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन वर्षातील पूर्व निर्धारित ३१ मार्चची डेडलाइन जूनपर्यंत लांबणीवर पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाच्या पहिल्या धावपट्टीवर लढाऊ विमान सी-२९५ मार्फत कॅलिब्रेशनची चाचणी घेतली. ती यशस्वी ठरल्याचे प्रमाणपत्र मिळाल्याने मार्च २०२५ मध्ये या आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या मालवाहू विमानाचे टेकऑफ होईल, असा विश्वास सिडकोसह अदानी इंटरप्रायजेस कंपनीने व्यक्त केला होता.
विलंबाचे कारण
विमानतळाच्या उर्वरित कामांना गती देण्यात आली. विशेष म्हणजे अलीकडेच विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीवर वैमानिकांना विमान उतरविण्याच्या वेळी दिव्यांच्या मार्गाची अचूक सूचना देणाऱ्या यंत्रणेची यशस्वी चाचणी झाली. असे असले तरी विमानतळावरून विमानाचे टेकऑफ करण्यासाठी आवश्यक असलेल्या अनेक पायाभूत सुविधांची कामे अपूर्ण आहेत. त्यामुळेच नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिल्या विमानाच्या टेकऑफची डेडलाइन लांबणीवर पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.
ही कामे अपूर्ण...
धावपट्टी, सिग्नल यंत्रणा आणि इतर कामे पूर्ण झाली असली तरी टर्मिनलच्या इमारतीचे काम अद्याप अपूर्ण आहे. ते पूर्ण करण्यासाठी आणखी सहा महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता व्यक्त होत आहे.