मनोज गडनीस - मुंबईकुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या नेमक्या ठावठिकाण्याची माहिती सरकारच्या हाती नसली तरी सध्या दाऊद इब्राहिम कासकर या नावाने सोशल मीडियात धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. दाऊदच्या नावे थेट फेसबुकच्या ‘फ्रेण्ड रिक्वेस्ट’ येण्यास सुरुवात झाल्याने फेसबुकवर खळबळ उडाली आहे. प्रस्तुत प्रतिनिधीलाही या खात्यावरून फ्रेण्ड रिक्वेस्ट आली असून, यानंतर ‘लोकमत’ने हा प्रकार पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे. बॉलीवूड, राजकीय नेते यांच्या नावाची बनावट खाती ही नवी नसली तरी गुन्हेगारी क्षेत्रातील आणि त्यातही दाऊदसारख्या कुख्यात डॉनच्या नावे आता खाती सुरू झाल्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढणार असून, अशा खात्याचा वापर ब्लॅकमेल करणे, समाजात तेढ निर्माण करणे याकरिता होऊ शकतो, असे मत तपास यंत्रणेतील सूत्रांनी व्यक्त केले. हे खाते बनावट असल्याचा कयास वर्तविला जात असला तरी, १०० टक्के तसा तर्क लावून याकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असेही मत सूत्रांनी व्यक्त केले. विख्यात संगणकतज्ज्ञ विजय मुखी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, हे अकाउंट खरे आहे अथवा नाही हे सांगणे जरी कठीण असले तरी याच्या आयपी अॅड्रेसवरून हे अकाउंट कुठून वापरले जात आहे, याची माहिती मिळू शकते. मात्र, अधिक माहिती हवी असेल तर फेसबुकशी थेट संपर्क साधावा लागेल. पण, एखाद्या खात्याची माहिती अथवा अनुषंगिक माहिती हवी असेल तर भारतच काय पण जगातील कोणत्याही तपास यंत्रणांना फेसबुक सहकार्य करीत नाही, हा आजवरचा अनुभव आहे. त्यामुळे या अकाउंटबद्दल अधिक माहिती कंपनीकडून मिळणे अशक्य असल्याचे मुखी म्हणाले. दाऊदच्या नावे असलेले हे खाते चतुराईने करण्यात आले आहे. फेसबुक प्रायव्हसी सेटिंगमधील बहुतांश फिचरचा वापर करून जोवर ही रिक्वेस्ट स्वीकारली जात नाही, तोवर त्याच्या अकाउंटवरील माहिती रिक्वेस्ट स्वीकारणाऱ्या व्यक्तीस दिसत नाही. पोलीस लावणार छडा‘लोकमत’ने हा प्रकार मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आणून दिला आहे. यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेचे उपायुक्त धनयंज कुलकर्णी यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, याची आम्ही दखल घेत असून, सायबर क्राईम शाखेच्या माध्यमातून याच्या तळापर्यंत जाऊन आम्ही याचा छडा लावू.
दाऊद पाठवतोय फेसबुक रिक्वेस्ट
By admin | Updated: January 23, 2015 02:41 IST