पनवेल : प्रथमच होत असलेल्या पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजण्यापूर्वीच साऱ्याच पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपापला प्रचार सुरू केला आहे. यात शिवसेनाही मागे नाही. सध्यातरी स्वबळाचा नारा देत, शिवसेनेने महापालिकेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यास सुरु वात केली आहे. त्यानुसार पुढील आठवड्यात उमेदवारांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेण्यास सुरु वात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे आदेश बांदेकर यांनी दिली.२० प्रभागांत एकूण ७८ नगरसेवक असणार आहेत. यासाठी सारेच पक्ष उमेदवार उभे करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी बुधवारी शिवसेनेच्या पनवेल येथील मध्यवर्ती कार्यालयात महापालिकेसाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. मात्र, अपेक्षित संख्येपेक्षा इच्छुक उमेदवारांची संख्या वाढल्यामुळे त्यांचे केवळ अर्ज स्वीकारण्यात आले. त्यामुळे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेता आलेल्या नाहीत. एकंदर बऱ्याच प्रभागात शिवसेनेला उमेदवार मिळणार नाहीत, असे शिवसेनेच्या काही कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र, साऱ्याच प्रभागातून शिवसेनेच्या इच्छुकांनी अर्ज केल्याने मुलाखती पुढे ढकलण्यात आल्या. इच्छुक उमेदवारांच्या गर्दीने शिवसेनेला जोरदार प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिसत होते. या वेळी महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, जिल्हा सल्लागार बबन पाटील, उपनेत्या मीनाताई कांबळे, किशोरी पेडणेकर, रमेश गुडेकर, शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख शिरीष घरत, तालुका प्रमुख वासुदेव घरत, रामदास पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
उमेदवारीसाठी शिवसेना कार्यालयात इच्छुकांची गर्दी
By admin | Updated: March 23, 2017 01:44 IST