- नामदेव मोरे नवी मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून ५० दिवसांत एपीएमसीमधून एक लाख टन धान्य मुंबईत पाठविण्यात आले आहे. अद्याप ४५ हजार टन धान्य मार्केटमध्ये उपलब्ध आहे. ११ मेपासून सात दिवस मार्केट बंद राहणार असल्यामुळे मुंबईकरांना पुरेसे धान्य उपलब्ध व्हावे, यासाठी रविवारीही मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे ११ ते १७ मे दरम्यान येथील पाचही मार्केट बंद ठेवण्यात येणार आहेत. सात दिवस मार्केट बंद राहणार असले तरी मुंबई व नवी मुंबईमध्ये धान्यटंचाई जाणवणार नाही, असा दावा प्रशासन व व्यापाऱ्यांनी केला आहे. कारण गेल्या ५० दिवसांमध्ये पुरेसे धान्य मुंबई व नवी मुंबईमध्ये पाठविण्यात आले आहे. बाजार समितीने घेतलेल्या आढाव्यात आतापर्यंत मार्केटमधून ९० हजार टन व थेट पणनच्या माध्यमातून १० हजार टन असे एकूण एक लाख टन धान्य वितरीत झाले आहे. ८ मेपर्यंत धान्य मार्केटमध्ये ४५ हजार टन धान्यसाठा उपलब्ध होता. शनिवारी रात्रीपर्यंत ४५० वाहनांमधून जास्तीत जास्त माल किरकोळ दुकानांपर्यंत पोहोचविण्यात येणार असून उरलेला मालही ग्राहकांपर्यंत पोहोचविता यावा, यासाठी रविवारी १० मे रोजीही मार्केट सुरू ठेवले जाणार आहे.एपीएमसी मार्केट व थेट पणन व्यतिरिक्त ठाणे परिसरातूनही मुंबईत काही प्रमाणात अन्नधान्याचा पुरवठा झाला आहे. बाजार समिती प्रशासनाने ठाणे परिसरातून वितरीत झालेल्या मालाची सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. नागरिकांनीही अन्नधान्याचा साठा करून ठेवला असल्यामुळे एक आठवडा मार्केट बंद झाल्यानंतरही मुंबईकरांना तुटवडा भासणार नाही.धान्य मार्केटमध्ये८ मेपर्यंत ४५ हजार टन धान्यसाठा उपलब्ध होता. शनिवारी मध्यरात्रीपर्यंत ४५० वाहनांमधून माल किरकोळ दुकानांपर्यंत पोहोचवला जाईल.एपीएमसीमधून लॉकडाउन सुरू झाल्यापासून जास्तीत जास्त अन्नधान्य मुंबईकरांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला आहे. ८ मेपर्यंत ४५ हजार टन धान्य उपलब्ध होते. शनिवारी रात्रीपर्यंत व रविवारी दिवसभरात जास्तीत जास्त धान्य मुंबईकरांना उपलब्ध करून दिले जाणार आहे.- अनिल चव्हाण,सचिव, एपीएमसीएपीएमसीमधील पाचही मार्केट सोमवारपासून एक आठवडा बंद राहणार आहेत. सर्व गाळे, गोदाम मोकळे करून साफसफाई केली जाणार आहे. संपूर्ण परिसराचे निर्जंतुकीकरण केले जाणार आहे. सर्वांची आरोग्य तपासणी करून आठ दिवसांत कोरोनाची साखळी तोडून नंतरच मार्केट सुरू केली जाणार आहेत. बाजार समिती प्रशासनाने ठाणे परिसरातून आतापर्यंत वितरित झालेल्या मालाची सविस्तर माहिती घेण्यास सुरुवात झाली आहे. मुंबईसह शहरात कुठेही अन्नधान्याचा तुटवडा भासणार नाही, याचीही दक्षता घेतली जात आहे.
coronavirus: साडेचार लाख टन धान्य एपीएमसीमध्ये उपलब्ध, आजही मार्केट सुरू राहणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2020 03:29 IST