CoronaVirus News: कोरोनामुळे इच्छुक उमेदवारांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले

By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2020 12:34 AM2020-08-12T00:34:37+5:302020-08-12T00:34:56+5:30

हंगामी समाजसेवक झाले गायब; मास्क वाटपापासून औषध फवारणीही स्वखर्चानेच

Corona disrupts financial management of aspiring candidates | CoronaVirus News: कोरोनामुळे इच्छुक उमेदवारांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले

CoronaVirus News: कोरोनामुळे इच्छुक उमेदवारांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनामुळे महानगरपालिका निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले आहे. जानेवारीपासून कार्यक्रमांचा धडाका लावणाºया इच्छुक उमेदवारांना आठ महिने सातत्याने खर्च करावा लागत आहे. आर्थिक क्षमता संपलेले अनेक हंगामी समाजसेवक गायब झाले आहेत. स्पर्धेत टिकून असलेल्या पदाधिकाऱ्यांना स्वखर्चाने औषध फवारणी, मास्क, सॅनेटायझरपासून इतर साहित्य वाटप करावे लागत आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एप्रिल महिन्यात होणे अपेक्षित होते. त्यासाठी निवडणूक प्रक्रिया सुरूही झाली होती. आरक्षण सोडतीसह मतदार याद्या अंतिम करण्याचे काम सुरू असतानाच कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाला व निवडणुका अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आल्या. सर्वपक्षीय नगरसेवक व इच्छुक उमेदवारांनी जानेवारीपासूनच कार्यक्रमांचा धडाका सुरू केला होता. पक्षाच्या प्रमुख नेत्यांची नवी मुंबईमध्ये हजेरी वाढली होती. महाविकास आघाडीने आदेश बांदेकर यांच्या कार्यक्रमाचे विभागवार आयोजन सुरू केले होते. भारतीय जनता पक्षाचे राज्य अधिवेशन नवी मुंबईमध्ये घेण्यात आले होते, परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्याने सर्व समीकरणेच बदलली. इच्छुकांचा खर्च वाढला आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यानंतर सर्व प्रमुख पक्षांच्या पदाधिकाºयांनी घरोघरी धान्यवाटप केले. यानंतर, मास्क, सॅनेटायझर, सोसायटींसाठी सॅनेटायझर स्टँडचे वाटप, मोफत अन्नदान सुरू केले होते.

कोरोना काळात कोण किती मदतीला आला, याचा विचार मतदार करणार हे गृहीत धरून सर्वांनीच मदतीचा ओघ वाढविला आहे. नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच सोसायटीच्या अंतर्गत कीटकनाशक फवारणी सुरू झाली आहे. पदाधिकाºयांनी स्वखर्चाने ही औषध फवारणी केली आहे. काही पदाधिकारी स्वत:च औषधांचे कॅन पाठीमागे अडकवून फवारणी करताना दिसत आहेत. कोरोना रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे, बेड उपलब्ध करून देणे, यापासून खासगी रुग्णालयातील बिल कमी करण्यापर्यंत सर्व कामे करावी लागत आहेत. सातत्याने ८ महिने खर्च करावा लागल्यामुळे अनेकांचे आर्थिक व्यवस्थापन कोलमडले आहे. हंगामी समाजसेवकांनी त्यांची कामे बंद केली आहेत. काहींनी फक्त पत्र, सोशल मीडियावर आवाहन यापुरतीच समाजसेवा सुरू ठेवली आहे. निवडणुका लवकर लागल्या नाहीत, तर अनेकांना समाजसेवा सुरू ठेवण्यासाठी कर्ज काढण्याची वेळ आली आहे.

पालकमंत्र्यांनीही मागविला अहवाल
सर्वच राजकीय पक्षांनी त्यांच्या इच्छुक उमेदवारांनी काय काम केले, यावर लक्ष ठेवण्यास सुरुवात केली आहे. यावेळी माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हातातून महापालिकेची सत्ता हिसकावून घेण्याचा निर्धार महाविकास आघाडीने केला आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईवर लक्ष केंद्रित केले आहे. पालकमंत्र्यांच्या कार्यालयातून काही दिवसांपासून शिवसेना पदाधिकाºयांना फोन सुरू झालेत. लॉकडाऊनच्या काळात कोणी काय काम केले याची माहिती पाठवा. निवडणुकीसाठी नवी मुंबईचा अहवाल तयार करायचा असल्याचे सांगण्यात येत आहे.

भाजपचेही प्रत्येक प्रभागावर लक्ष
भाजपच्या नेत्यांनीही कोरोनाच्या काळात विविध उपक्रम राबविले आहेत. प्रत्येक प्रभागामध्ये नागरिकांना मदत पोहोचवावी, यासाठी पक्षाचे नेते लक्ष ठेवून आहेत. बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनीही सातत्याने शहरवासीयांचे प्रश्न सोडविण्यासाठी आयुक्तांशी पाठपुरावा केला आहे. स्वत: मदतकार्य नागरिकांपर्यंत पोहोचविले आहे. इतर प्रश्न सोडविण्यासही प्राधान्य दिले आहे. माजी मंत्री गणेश नाईक प्रथमच प्रत्येक आठवड्याला पालिका आयुक्तांची प्रत्यक्षात भेट घेत आहेत.

लांबलेल्या निवडणुका नागरिकांच्या पथ्यावर
महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर कोरोनाचे संकट आले असते, तर अनेक समाजसेवक व नगरसेवकही गायब झाले असते. मदतीसाठी कोणीही उपलब्ध झाले नसते, परंतु निवडणुका होणार असल्यामुळे आता सर्वच माजी नगरसेवक, पक्षाचे वरिष्ठ नेते, इच्छुक उमेदवार दिवसरात्र मेहनत घेत असल्यामुळे नागरिकांनी गैरसोय होत नाही.

Web Title: Corona disrupts financial management of aspiring candidates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.