आविष्कार देसाई, अलिबागकृषी उत्पन्न बाजार समितीपाठोपाठ आता दूधमाफियांचे कंबरडे मोडण्याची तयारी सुरू झाली आहे. दुधाची मलई खाणाऱ्या या मध्यस्थांच्या मोठ्या साखळीला रायगड जिल्ह्यातून सुरुंग लागणार आहे. ‘रायगड दूध’ या नावाने रायगडकरांना कमी दरात घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे रायगडवासीयांचे लीटरमागे सात रुपये वाचणार आहेत. दूध हा मानवी जीवनाच्या आहाराचा अविभाज्य भाग आहे. मात्र वाढत्या महागाईच्या जमान्यामध्ये गरिबांना सोडाच, पण सर्वसामान्यांनाही ते परवडेनासे झाले आहे. दिवसेंदिवस दुधामध्ये वाढत जाणारी भेसळ आणि त्याचे वाढणारे दर ही ग्राहकांसाठी समस्या बनत आहे. दुधाच्या भेसळीबाबत संसद, विधिमंडळामध्ये रणकंदन माजले होते. उच्च न्यायालयाने याबाबत चिंता व्यक्त केली होती. दुधातील भेसळ पूर्णत: बंद करण्यात सरकारी यंत्रणांना अद्यापही यश आलेले नाही. दूध उत्पादक शेतकरी प्रचंड मेहनत घेऊन दुधाचे उत्पादन घेतो. ग्रामीण भागामध्ये अत्यंत कमी दरात हे दूध तो विकतो. त्या दुधातील मलई काढून तेच दूध पिशवी बंदरीत्या चढ्या दराने शहरी भागांमध्ये विकले जाते. अशा दुधाचा दर्जा सुमार असतो. भेसळयुक्त दुधामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याचे प्रमाण वाढत आहे. मध्यस्थांच्या साखळीमुळे दुधाचे दर वाढत जातात. काहीच दिवसांपूर्वी गायी आणि म्हशीच्या दुधाच्या दरात लीटरमागे प्रत्येकी दोन रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे गायी, म्हशीचे दूध अनुक्रमे ४२ आणि ५४ रुपयांनी विकले जात आहे. ग्राहकांना असे दूध विकत घेण्यावाचून पर्याय नसतो. आता मात्र ग्राहकांची अशा जाचातून सुटका होणार आहे. अलिबाग येथील रायगड बाजार या सहकारी संस्थेच्या माध्यमातून रायगडकरांना कमी दरात घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यामुळे रायगडवासीयांचे लीटरमागे सात रुपये वाचणार आहेत. गायीचे दूध ३५ रुपये, तर म्हशीचे दूध ४७ रुपये लीटरने ग्राहकांना विकत घेता येणार आहे. रायगड जिल्हा हा पूर्वी दुधाचे आगर समजला जात होता. कालांतराने औद्योगिकीकरण वाढल्याने शेतीचे क्षेत्र कमी झाले. कर्जत, खालापूर, पाली-सुधागड, माणगाव, महाड तालुक्यात दुधाचे उत्पादन घेतले जाते, मात्र तेही जिल्ह्याची गरज भागवू शकत नाही.
दुधाची ‘मलई’ खाणाऱ्यांना लागणार सुरुंग
By admin | Updated: July 13, 2016 02:08 IST