बेलापूरमध्ये उमेदवार निवडीचा गुंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2019 11:13 PM2019-08-25T23:13:36+5:302019-08-25T23:13:39+5:30

लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची नवी मुंबईत चांगलीच पिछेहाट झाली.

The complexity of candidate selection in Belapur | बेलापूरमध्ये उमेदवार निवडीचा गुंता

बेलापूरमध्ये उमेदवार निवडीचा गुंता

Next

- कमलाकर कांबळे
नवी मुंबई : माजी मंत्री गणेश नाईक यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे बेलापूर विधानसभा क्षेत्रातील राजकीय गणिते बदलणार आहेत. नाईकांचा भाजप प्रवेश अद्यापि झालेला नाही. पुढील काही दिवसांत भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून ते भाजपवासी होतील, असे आडाखे त्यांच्या निकटवर्तींकडून बांधले जात आहेत. त्यांच्या अधिकृत पक्षांतरानंतरच बेलापूर विधानसभा मतदारसंघाचे चित्र स्पष्ट होणार आहे. २0१४ मध्ये बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे विजयी झाल्या होत्या. अवघ्या दोन हजार मतांनी नाईकांचा त्यांनी पराभव केला होता. आता नाईक स्वत:च भाजपच्या वाटेवर असल्याने बेलापूरमधून नाईक की, म्हात्रे यापैकी कोणाला तिकीट मिळते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.


लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांची नवी मुंबईत चांगलीच पिछेहाट झाली. बेलापूर विधानसभा मतदार संघातून शिवसेनेचे राजन विचारे यांना तब्बल ४0 हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात चिंतेचे वातावरण निर्माण झाले. याचा परिणाम म्हणून नाईक यांनी महापालिकेतील राष्ट्रवादीच्या ५२ नगरसेवकांसह भाजपत जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही आजी-माजी पदाधिकाऱ्यांसह आमदार संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश करून या प्रक्रियेचा शुभारंभही केला आहे; परंतु गणेश नाईक व त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव संजीव नाईक तसेच त्यांचे समर्थक ५२ नगरसेवक अद्यापि वेट अ‍ॅण्ड वॉचच्या भूमिकेत आहेत. असे असले तरी त्यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे नवी मुंबईतील राजकारणाला पुरती कलाटणी मिळाली आहे. भाजपकडून नाईक यांच्यावर ठाणे जिल्ह्याची जबाबदारी टाकली जाईल, असे राजकीय अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे त्यांना ठाणे विधानसभा मतदार संघातून उमेदवारी दिली जाण्याची एक अशक्यप्राय शक्यताही वर्तविली जात आहे. त्याही पुढे जाऊन नाईक यांना मागच्या दाराने मंत्रिपद दिले जाण्याच्या शक्यतेवर सुद्धा खल केला जात आहे. मात्र, नाईक यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द पाहता या सर्व शक्यता निरर्थक ठरणाºया आहेत. कारण नाईक यांचा लोकांतून निवडून जाण्यावर भर राहणार हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर भाजपश्रेष्ठी काय निर्णय घेते, हे सध्यातरी सांगणे अवघड आहे.


बेलापूरच्या विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांनी मागील पाच वर्षांत आपला मतदारसंघ हालता ठेवला आहे. मतदारसंघातील विविध प्रश्न मार्गी लावले आहेत. सिडकोच्या जुन्या इमारतींच्या पुनर्बांधणीसह प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी भरीव व निर्णायक काम केले आहे. त्याशिवाय मतदारसंघात त्यांनी अनेक नवीन प्रकल्पांना चालना दिली आहे. एकूणच विविध उपक्रमांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मतदार संघातील जनसंपर्क अबाधित ठेवला आहे. त्याशिवाय पक्षाच्या माध्यमातून राबविल्या जाणाºया राष्ट्रीय व राज्यस्तरीय विविध कार्यक्रमांच्या आयोजनात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. अशा परिस्थितीत भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळते की, पुनर्वसनाची हमी देऊन बेलापूरमधून नाईकांची वाट मोकळी केली जाते, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.


नाईक यांच्या संभाव्य भाजप प्रवेशामुळे बदललेल्या राजकीय समीकरणाने शिवसेनेच्या भूमिकेलासुद्धा तितकेच महत्त्व प्राप्त झाले आहे. विधानसभेच्या मागील निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. शिवसेनेने विजय नाहटा यांना या निवडणुकीत उमेदवारी दिली होती. या निवडणुकीत नाहटा यांना ५0,९८३ इतकी मते मिळाली होती.


अलीकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना बेलापूरमधून ४० हजार मतांची आघाडी मिळाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यात वाढ झाल्याने नाहटा यांचे मनोबल वाढले आहे. याचा परिणाम म्हणून त्यांनी पुन्हा विधानसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. युती झाल्यास बेलापूर मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असणार आहे; परंतु युतीच्या वाटाघाटी बिघडल्यास नाहटा हे बेलापूरमधून शिवसेनेचे उमेदवार असतील, हे निश्चित मानले जात आहे. नाईक यांच्या भाजप प्रवेशानंतर राष्ट्रवादीचे अस्तित्व नगण्य असणार आहे. त्यामुळे गटागटात सक्रिय असलेल्या काँग्रेसला सुद्धा या निवडणुकीत संघर्ष करावा लागणार आहे. तर बदललेल्या राजकीय समीकरणाच्या तडाख्यात वंचित आघाडीलासुद्धा बेलापूरमधून फारसा प्रभाव टाकता येईल, असे वाटत नाही.

मनसेच्या भूमिकेला महत्त्व
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि गणेश नाईक यांचे संबंध सर्वश्रुत आहेत. मागील काही निवडणुकीत मनसेने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष नेहमीच नाईक यांना सहकार्य केले आहे. सध्या भाजप हा मनसेचा क्रमांक एकचा शत्रू आहेत. आता नाईक स्वत:च भाजपच्या वाटेवर आहेत. नवी मुंबईत मनसेची संघटनात्मक बांधणी मजबूत नसली तरी राज ठाकरे यांना मानणारा वर्ग मोठा आहे. त्यामुळेच या विधानसभा निवडणुकीतील मनसेच्या भूमिकेला महत्त्व असणार आहे.

मागील निवडणुकीतील मतांचा तपशील
विधानसभेच्या २0१४ मधील निवडणुकीत शिवसेना आणि भाजप स्वतंत्र लढली होती. बेलापूर मतदारसंघातून भाजपच्या मंदा म्हात्रे ५५,३१६ तर शिवसेनेचे विजय नाहटा यांना ५0,९८३ इतकी मते पडली होती, तर राष्ट्रवादीचे गणेश नाईक यांना ५३,८१६ इतकी मते मिळाली होती.

Web Title: The complexity of candidate selection in Belapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.