नवी मुंबई : वाशी सेक्टर ८ मधील पादचारी पूल वेळेत दुरुस्त करण्यात आला नाही. धोकादायक पुलाचा वापरही पालिकेने न थांबविल्यामुळे अपघात झाला आहे. येथील पंपहाउसची इमारतही धोकादायक झाली आहे. पंपहाउसकडे येणारे पाइप ठेवण्यासाठी उभारलेल्या पिलरलाही तडे गेले आहेत.
सागर विहार व मिनी सीशोर परिसराला रोज हजारो नागरिक भेट देत असतात. दोन्ही ठिकाणी ये-जा करता यावे, यासाठी महापालिकेने होल्डिंग पॉण्डवर पादचारी पुलाची निर्मिती केली. ४ मे २००० मध्ये हा पूल वाहतुकीला खुला करण्यात आला. खाडीकिनारी असल्यामुळे पुलाचा लोखंडी सांगाडा गंजला आहे. हातानेही लोखंडाचा भाग निघू लागला होता. स्थानिक नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड यांनी पालिकेकडे यासाठी पाठपुरावाही केला होता. दक्ष नागरिकांनीही ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती; परंतु महापालिकेने वेळेत दुरुस्तीचे काम केले नाही. सद्यस्थितीमध्ये दुरुस्तीसाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे; परंतु पुलाचे बांधकाम धोकादायक असूनही त्याचा वापर सुरूच होता. महापालिका प्रशासनाने पुलाचा वापर बंद करणे आवश्यक होते; पण यासाठी योग्य खबरदारी न घेतल्यामुळे गुरुवारी पूल कोसळला व दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पंपहाउसची इमारतही धोकादायक झाली असून अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. छताचीही अवस्था बिकट आहे. जीव मुठीत धरून काम करावे लागत आहे. पंपहाउस व पादचारी पूलाची दुरुस्ती करण्यासाठी नागरिकांसह लोकप्रतिनिधी वारंवार पाठपुरावा करत आहेत; परंतु प्रशासकीय दिरंगाईमुळे पूल कोसळला असून, पंपहाउसही कोणत्याही क्षणी कोसळू शकतो, अशी स्थिती आहे.