अलिबाग : खालापूर तालुक्यातील तांबाटी गावच्या हद्दीतील एक बंद कंपनी आपलीच असल्याचे दाखवून तेथील भंगार (स्क्र्रॅप) माल स्वत:चा आहे, असे भासवून तो फिर्यादीस १६ लाख रु पयांना विकला. त्यापैकी आठ लाख ३१ हजार रुपये फिर्यादीकडून आगाऊ (टोकन) म्हणून घेऊन, त्यातील आठ लाख रुपये एम.के.ट्रेडर्सच्या नावावर बँकेतून आरटीजीएस करून उर्वरित रक्कम रोख स्वरूपात फिर्यादी यांच्याकडून घेऊन त्यांची फसवणूक केली. या प्रकरणी एका आरोपीस खालापूर पोलिसांनी खारघर(नवी मुंबई) येथे बुधवारी अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने त्यास १४ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या १७ ते २० मे २०१७ दरम्यान हा गुन्हा घडला असून त्यामध्ये एकूण तीन आरोपी आहेत.या गुन्ह्याप्रकरणी खालापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान उपलब्ध झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे खालापूरचे पोलीस निरीक्षक जे. एस. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोहवा सुभाष पाटील, पोना सागर शेवते, पोना एन. एम. कोकाटे, पोशि ए. आर. चव्हाण, पोशि आर. एम. चौगुले यांच्या संयुक्त पथकाने सापळा रचून या आरोपीस बुधवारी खारघर (नवी मुंबई) येथून ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत चौकशी केली असता, आरोपीने गुन्हा केल्याचे कबूल केल्यानंतर त्यास अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले होते.अशा प्रकारच्या फसवणुकीला व खोट्या बतावणीला बळी न पडता, कोणाचीही अशा प्रकारे फसवणूक झाली असल्यास त्यांनी त्वरित खालापूर पोलीस निरीक्षक जे. एस. शेख यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन रायगड पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.
बंद कंपनी आपलीच भासवून, भंगारविक्री व्यवहारात फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2017 02:11 IST