नवी मुंबई : गेल्या बुधवारपासून सफाई कामगारांनी सुरू केलेले आंदोलन बेकायदेशीर आहे. पाच दिवस कचरा उचलला न गेल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. संपावर गेलेल्या सर्व कामगारांची विविध कंत्राटदारांच्या माध्यमातून नेमणूक केलेली आहे. त्यांचा सिडकोशी कोणताही थेट संबंध नाही. संप करून नागरिकांना वेठीस धरण्यापेक्षा आपल्या प्रश्नांसाठी योग्य मार्गाचा अवलंब करावा, असे सिडकोच्या वतीने स्पष्ट केले आहे.खारघर, कामोठे, कळंबोली, पनवेल या सिडको नोड्समधील दैनंदिन घनकचरा उचलून त्याची वाहतूक करणे तसेच रेल्वे स्थानकांची साफसफाई करण्यासाठी सिडकोच्या माध्यमातून ३५ कंत्राटदारांची नेमणूक करण्यात आली आहे. या कंत्राटदारांनी नेमलेल्या विविध विभागातील सफाई कामगारांनी १२ एप्रिलपासून बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. सलग पाच दिवस शहरातील कचरा उचलला न गेल्याने सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे दिसून येते. त्यामुळे नागरी आरोग्य धोक्यात आले आहे. निर्माण झालेल्या या समस्येवर सिडको प्रशासन तोडगा काढण्यात अपयशी ठरल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर सिडकोने आपली भूमिका स्पष्ट केली आहे.महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा सन २0११ अन्वये साफसफाई, घनकचरा उचलणे व वाहतूक करणे या सेवांचा अत्यावश्यक सेवेत समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या सफाई कामगारांचे सुरू असलेले आंदोलन नियमबाह्य व बेकायदेशीर आहे. विविध विभागात काम करणारे हे संपकरी कामगार कंत्राटदारांच्या माध्यमातून नेमलेले आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष सिडकोशी कोणताही संबंध नसल्याचे सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले. विविध विभागातील साफसफाईसाठी नेमलेल्या ठेकेदारांकडून कामगारांसाठी अतिरिक्त वाढ किंवा इतर सोयी-सुविधांसाठी कोणतीही मागणी सिडकोकडे केलेली नाही. ठेकेदाराबरोबर झालेल्या करारनाम्यात किंवा निविदा अटी शर्तीत त्यांच्याकडे काम करीत असलेल्या कामगारांना मोबदला वाढवून देण्यासंदर्भात कोणतीही तरतूद नाही. ठेकेदाराकडे काम करीत असलेल्या सफाई कामगारांना सध्या देण्यात येणारा मोबदला किमान वेतन कायद्यातील तरतुदीपेक्षा जास्त असल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. तसेच सफाई कामगारांना द्यावयाचे वेतन व इतर सुविधा देण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित कंत्राटदारांची आहे. १९ मे २0१५ पासून सिडको संचालक मंडळाच्या निर्णयानुसार कंत्राटदारांमार्फत सफाई कामगारांना काही विशेष फायदे देण्यात आले आहेत. सिडकोकडून कंत्राटदारांना देय असलेल्या मोबदल्यात त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांचा पगार, भविष्य निर्वाह निधीची रक्कम, वार्षिक बोनस, ग्रॅच्युईटी, सार्वजनिक सुटीच्या दिवशी काम केल्याचे रोखीकरण, वैद्यकीय विमा इत्यादीची तरतूद करण्यात आलेली आहे. ही वस्तुस्थिती असताना बेकायदेशीरपणे संप करून नागरिकांना वेठीस धरणे योग्य नसल्याचे सिडकोने स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)
सफाई कामगारांचे आंदोलन बेकायदेशीर
By admin | Updated: April 18, 2017 06:52 IST