लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : पनवेल महापलिकेच्या निवडणुकीत भाजपाला भरघोस यश मिळाले असून, मुख्यमंत्र्यांच्या सभेने ‘जलवा’ दाखवला असल्याचे समोर आले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या खारघर व नवीन पनवेल येथील सभांमुळे भाजपाला खारघर व नवीन पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात यश मिळाले आहे.महापालिकेच्या निवडणुकीत भाजपा व आरपीआय यांची युती, शेकाप, काँग्रेस व राष्ट्रवादी यांची आघाडी, तर शिवसेना व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची युती होती. त्यामुळे सत्तेत कोण येणार? याकडे साऱ्यांचेच लक्ष लागून राहिले होते. अखेर जाहीर झालेल्या निकालात भाजपाने जोरदार मुसंडी मारत, पालिकेवर सत्ता मिळविली आहे. अनेक नाट्यमय घडामोडींनी गाजलेल्या पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. पनवेलमध्ये यंदाची निवडणूक अनेक घटनांनी गाजली होती. महापालिकेत भाजपाने एकहाती कमळ फुलवले. पनवेलकर जनतेने अनेक दिग्गजांना या निवडणुकीत पराभवाची धूळ चारली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राम शिंदे, प्रीतम मुंडे यांच्या सभा व रोड शोने पनवेलमधील वातावरण ढवळून निघाले होते. भाजपाची जबाबदारी राज्यमंत्री रवींद्र चव्हाणांवर दिली होती. त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थितरीत्या पार पाडली आहे. तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरेंनी रोड शो घेत, आदेश बांदेकरांवर प्रचाराची धुरा सोपवली होती. मात्र, मतदारांनी शिवसेनेला नाकारत एकही नगरसेवक निवडून दिला नाही. त्यामुळे ठाकरे कंपनीचा प्रभाव पनवेलमध्ये दिसला नाही.मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी पनवेलकडे ढुंकूनही पाहिले नाही, त्यामुळे मनसेला येथे खातेदेखील उघडता आले नाही, तर भाजपाचा प्रमुख प्रतिस्पर्धी असलेल्या शेकाप आघाडीने माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, राधाकृष्ण विखे-पाटील यांची फौज प्रचारात उतरवली होती. मात्र, मतदारांनी भाजपावर विश्वास ठेवत शेकापलाही नाकारले आहे. त्यांना २७ जागांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुकीत मुख्यमंत्र्यांचा ‘जलवा’ दिसून आला, तर उद्धव व आदित्य ठाकरेंच्या रोड शोचा शून्य परिणाम दिसला.
मुख्यमंत्र्यांच्या सभेचा ‘जलवा’
By admin | Updated: May 27, 2017 02:28 IST