नवी मुंबई : बीएआरसीचे शास्त्रज्ञ असल्याचे सांगून संशोधनासाठी विशेष भांड्याचा शोध सुरू आहे. त्याकरिता वाटेल ती किंमत द्यायची तयारी असल्याचे सांगून अनेकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या तोतया शास्त्रज्ञास त्याच्या टोळीसह अटक झाली आहे. त्याने राज्यात अनेकांची राइस पुलरच्या बहाण्याने फसवणूक केली असून, त्यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.नासा येथे संशोधनासाठी विशेष प्रकारच्या धातूची गरज असून, त्या भातपासून बनलेल्या भांड्याच्या शोधात बीएआरसीचे शास्त्रज्ञ आहेत. विशेष धातूच्या या भांड्यासाठी कोट्यवधी रुपये मोजण्याची तयारी आहे. मात्र असे भांडे तपासण्यासाठी एक उपकरण आवश्यक असून ते देखील या शास्त्रज्ञांकडे आहे, असे सांगून पैशाच्या मोहात पाडून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या तिघा भामट्यांना गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. एका व्यक्तीने अशा प्रकारे झालेल्या फसवणुकीची तक्रार एनआरआय पोलिसांकडे केली होती. त्यानुसार गुन्हे शाखा युनिट १ चे वरिष्ठ निरीक्षक देविदास सोनवणे यांच्या पथकाने एनआरआय परिसरातून तोतया शास्त्रज्ञास सहकाऱ्यांसह अटक केली. पुंजू पुजारी (३५) असे त्याचे नाव असून, संतोष शिंदे व धनश्री राणे (३५) हे त्याचे सहकारी आहेत. ते डोंबिवली व अंधेरीचे राहणारे असून पुंजू हा स्वत:ला मोठा शास्त्रज्ञ भासवण्यासाठी महागडी कार व सोबत खासगी सुरक्षारक्षकही बाळगून होता.संशोधनासाठी लागणारे विशेष धातूचे हे भांडे मशिनमध्ये ठेवल्यास त्या भांड्याकडे तांदूळ खेचले जातात. जेवढ्या लांबून तांदूळ खेचले जातील तेवढी त्या भांड्याची किंमत जास्त. यानुसार कोट्यवधी रुपये देऊन ते भांडे खरेदी करणारे बनावट ग्राहकही त्यांच्या सोबतच असायचे. मात्र भांडे तपासणीसाठी लागणारे मशिन व सोबतची उपकरणे खरेदीसाठी साडेचार लाख ते १० लाख रुपयांपर्यंतची किंमत सांगितली जायची. लाखो रुपये देवून हे उपकरण हाती लागल्यानंतर त्यामध्ये केवळ एक प्लास्टिकचा डबा व त्यामध्ये भरलेले काळ्या रंगाचे द्रव संबंधिताच्या हाती लागायचे. या टोळीने भांडुप, निपाणी, कोल्हापूर व सातारा येथील अनेकांना फसवलेले असल्याचे उपायुक्त दिलीप सावंत यांनी सांगितले. त्यापैकी अनेकांनी प्रतिष्ठेपोटी पोलिसांकडे तक्रार केलेली नाही. (प्रतिनिधी)
संशोधनाच्या नावाखाली फसवणूक
By admin | Updated: March 13, 2016 03:46 IST