नवी मुंबई : राज्यात ई-गव्हर्नन्सचा गवगवा होत असतानाच सिडकोने मात्र माहिती अधिकार कार्यकर्त्यांची पायपीट चालवली आहे. अनेक महिन्यांपासून सिडकोच्या संकेतस्थळावर आॅनलाइन पेमेंटची प्रक्रिया ठप्प आहे. यामुळे आॅनलाइन अर्जाऐवजी प्रत्यक्ष सिडकोत जाऊन माहिती अधिकाराचे अर्ज जमा करावे लागत असल्याची नाराजी माहिती अधिकार कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात ई- गव्हर्नन्सला प्राधान्य देत नागरिकांना आॅनलाइन सुविधा देण्यावर भर दिला आहे. मात्र त्यांच्या या धोरणाला राज्याच्या नगरविकास विभागाचा भाग असलेल्या सिडकोने बगल दिल्याचे पहायला मिळत आहे. मागील अनेक महिन्यांपासून सिडकोच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन माहिती अधिकार अर्जाची प्रक्रिया ठप्प आहे. पेमेंट गेटवेमध्ये तांत्रिक बिघाडामुळे हा खोळंबा झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे. यामुळे माहिती अधिकाराचा अर्ज करताना शुल्क भरण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होत आहे. तर शुल्क भरण्याची प्रक्रियाच पूर्ण होत नसल्याने अर्ज सिडकोकडे जमा होवू शकत नाहीत. त्यामुळे केवळ ज्यांना सेवा शुल्क माफ असे अल्प उत्पन्नधारकच सिडकोच्या संकेतस्थळावरून आॅनलाइन माहिती अधिकाराचा अर्ज करू शकत आहेत. त्यामुळे सिडकोने ही सुविधा केवळ ठरावीक घटकांसाठीच सुरू ठेवली आहे का? असा देखील प्रश्न उपस्थित होत आहे.‘आपले सरकार’ या शासनाच्या संकेतस्थळावरून राज्यातील अनेक महापालिका व शासकीय कार्यालयांना थेट माहिती अधिकारांतर्गत अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे. मात्र त्यातही सिडकोचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात सिडकोच्या संकेतस्थळावरील आॅनलाइन अर्ज प्रक्रिया असणे आवश्यक आहे. परंतु अनेक दिवसांपासून पेमेंट गेटवेचा बिघाड होवूनही, त्यात जाणीवपूर्वक सुधार केला जात नसल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. (प्रतिनिधी)
सिडकोची आॅनलाइन अर्ज सुविधा ठप्प
By admin | Updated: March 21, 2017 02:09 IST