बोर्डी : गणपतीपूजनात केवड्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. गणेशभक्तांकडूनही त्याला मागणी चांगली असल्याने किंमत अधिक असतानाही हातोहात विक्री होते.त्यामुळे सध्या गणेशोत्सवानिमित्त बोर्डी परिसरातून केवड्याची निर्यात वाढली आहे.विठ्ठलाला तुळस, शंकराला बेल, मारुतीला रुई तसेच गणपतीपूजनाला दुर्वा, जास्वंदी यांसह केवड्याचे स्थान महत्त्वाचे आहे. गणेशोत्सवानिमित्त फुलबाजारात केवड्याची मागणी वाढली आहे. डहाणू तालुक्यातील नरपड चिखलेगावातील समुद्रकिनाऱ्यालगत शेती आणि ओहोळाच्या काठी केवड्याची बने आहेत. केवड्याच्या काटेरी झुडुपांचा कोट भेदणे अशक्य असल्याने कुंपणाकरिता त्याची लागवड होते. तरीही ८ ते १० वर्षांपासून केवड्याच्या क्षेत्रात घट झाली आहे. गणेशचतुर्थीच्या आठ दिवस अगोदर काटेरी झुडुपांवर चढून न उमटलेला केवडा काढला जातो. या काढणीकरिता अनुभव आणि कौशल्य आवश्यक असते. अन्यथा, केवड्याची नासाडी तर होतेच, पण शरीराला जखमा होतात. आदिवासी मुले यामध्ये पटाईत असतात. प्रतवारीनुसार स्थानिक पातळीवर ५० रुपयांपासून १५० रुपयांपर्यंत विक्री केली जाते. रेल्वेतून येथील शेतमाल मुंबईला विकणाऱ्या महिला विरार, दादरसह अन्य फुलबाजारात केवडा पोहोचवतात. त्यातून घसघशीत कमाई होते. ‘‘१० ते १२ फूट उंच झुडुपांवर चढून काटेरी पानांतून केवडा सहीसलामत काढणे यात कसब आहे. आव्हान पेलण्यात खरी मजा असते. दोन पैसेही मिळतात. असे चिखले गावातील अमित रसाले, वैभव हाडळ, अतुल गांगात या केवडा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांनी सांगितले.
बोर्डीत केवडा दरवळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 03:47 IST