- अरुणकुमार मेहत्रे। लोकमत न्यूज नेटवर्ककळंबोली : पनवेल महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला मिळालेली मतांची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. २०१४ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्यापेक्षा ही संख्या दुपटीहून अधिक आहे. शेकाप आघाडीपेक्षा कमळाला २७८३६ जास्त मतदान झाले असल्याचे शुक्र वारी जाहीर झालेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, या वेळी तीनही पक्ष एकत्रित आले होते, तरीसुद्धा भाजपाचे मताधिक्य कमी न होता वाढले आहे. पुढील विधानसभेकरिता पक्षाला शुभसंकेत मिळाले असल्याचे मत पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे.पनवेल विधानसभा मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर दोनदा निवडून आले. त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे बाळाराम पाटील यांचा दोनही वेळा जवळपास १२ हजारांच्या फरकाने पराभव केला, म्हणजे आ. ठाकूर यांनी सातत्याने हा फरक कायम टिकवून ठेवला. शेतकरी कामगार पक्षानेही हा आकडा वाढवून दिला नाही. महापालिका क्षेत्रातील मतदान केंद्रनिहाय भाजपाला विधानसभेत मिळालेल्या आकडेवारीवरून निवडणुकीची रणनीती आखण्यात आली होती. त्यानुसार त्या त्या प्रभागांत भाजपाने जोर दिला होता. त्यांचे हे सूक्ष्म नियोजन अतिशय फायदेशीर ठरले असल्याचे शुक्र वारी लागलेल्या निकालावरून स्पष्ट झाले. पनवेल विधानसभा मतदारसंघातील बहुतांशी भाग हा महापालिका क्षेत्रात येतो. येथे एकूण मतदारसंख्या ४२५४५३ इतकी आहे. त्यापैकी ५५ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क पनवेल महानगरपालिका निवडणुकीत बजावला. म्हणजे २३३९९९ इतक्या मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला होता. ५५ टक्क्यांत भाजपाला २८.४० टक्के मतदान झाले. तर शेकाप आघाडीला २१.१६ टक्के मतदारांनी पसंती दिली. जवळपास सात टक्के जास्त मते भाजपाला मिळाली आहेत. उरलेले ५.४४ टक्के मते ही शिवसेना, मनसे आणि अपक्षांच्या खात्यावर जमा झाली. गेल्या दोन विधानसभा निवडणुकीचा विचार करता, पनवेल महानगरपालिकेत आ. प्रशांत ठाकूर यांच्या पर्याने भारतीय जनता पक्षाच्या मताधिक्यामध्ये कमालीची वाढ झालेली आहे. नवीन पनवेल, पनवेल, खांदा वसाहत, कामोठे, खारघर या ठिकाणी मतदारांनी कमळाला क्र मांक एकची पसंती दिलीच. त्याचबरोबर कळंबोली, तसेच ग्रामीण प्रभागातही भाजपाला चांगले मतदान झाले. त्यामुळे जवळपास २८ हजारांच्या घरात भाजपा शेकाप आघाडीपेक्षा आघाडीवर असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही आघाडी विधानसभेत बारा हजारांची होती, त्यामध्ये कमालीची वाढ झाली आहे. ग्रामीण मतदारांवर शेकापचाच प्रभावशेतकरी कामगार पक्षाची शहरी भागात पीछेहाट झाली असली, तरी ग्रामीण टच असलेल्या मतदारांवर प्रभाव कायम असल्याचे कालच्या निकालावरून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. चार प्रभागांत सोळापैकी चौदा जागा जिंकून येथील मतदारांनी शेकाप आघाडीला पाठबळ दिले. ज्याप्रमाणे शेकाप शहरी वसाहतीत ताकद कमी पडली त्याचप्रमाणे ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या प्रभागांत भाजपाला प्रभाव पाडता आलेला नाही. पनवेल महानगरपालिका क्षेत्रात पनवेल शहरासह सिडको वसाहत आणि २९ महसुली गावांचा समावेश करण्यात आलेला आहे. शहरीबहूल परिसर महापालिकेत जास्त आहे. येथील मतदार विशेष करून राष्ट्रीय पक्षाला पसंती देत असल्याचे कालच्या महापालिका निवडणूक निकालावरून स्पष्ट झाले आहे. मात्र, शेतकरी कामगार पक्षाचा ग्रामीण भागात प्रभाव आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीनंतर महापालिका निवडणुकीत ते पुन्हा एकदा सिद्ध झाले. शेकापची मदार ही कॉस्मोपोलिटन नाही, तर स्थानिक मतदारांवर आहे. हेच मतदार लाल बावट्याला तारीत असल्याचेही मागील काही निकालांवरून दिसून आले आहे. महसुली गावांत १,२,३ आणि ९ या चार प्रभागांचा समावेश आहे. या प्रभागांत शेकाप-काँग्रेस आघाडीने बाजी मारली.
महापालिका निवडणुकीत भाजपाचे मताधिक्य वाढले
By admin | Updated: May 28, 2017 03:17 IST