पनवेल : पनवेल भाजपामधील तीन पदाधिका-यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सेनेमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. तालुका उपाध्यक्ष रामदास शेवाळे यांच्यासह इतर दोन महत्त्वाच्या पदाधिका-यांचा यामध्ये समावेश आहे. सेना भवनात झालेल्या कार्यक्रमात हा पक्ष प्रवेश करण्यात आला. रामदास शेवाळे यांनी नुकताच भाजपाच्या तालुका उपाध्यक्ष पदाचा राजनामा दिला होता. मराठी मोर्च्यावेळी कळंबोली येथे निर्माण झालेल्या उद्रेकात आंदोलकांवर गुन्हे दाखल केल्यानंतर त्यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली होती.आंदोलकांना विनाकरण गुन्ह्यांमध्ये अडकविल्याचा ठपका भाजपा सरकारवर ठेवला होता. स्थानिक आमदार प्रशांत ठाकूर यांनी देखील या प्रकरणात लक्ष घातले नसल्याचे कारण पुढे करीत त्यांनी भाजपाला सोडचिठ्ठी दिली होती. अखेर त्यांनी सेनेत प्रवेश केला आहे. आगामी विधानसभा निवडणुका पाहता रामदास शेवाळे यांचे प्रवेश महत्त्वाचे मानले जात आहे.शेवाळे यांच्यासह तालुका भाजपाचेच उपाध्यक्ष शंकरशेठ ठाकूर व तालुका चिटणीस दत्तात्रेय वर्तेकर यांनी देखील भाजपला सोडचिठ्ठी देत उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून सेनेत प्रवेश केला. यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आदेश बांदेकर, जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील, आमदार मनोहर पाटील, उपजिल्हा प्रमुख शिरीष शेठ घरत आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
भाजपाला खिंडार! उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत भाजपा पदाधिका-यांचा सेनेत प्रवेश
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 20:01 IST