- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी ३० एप्रिलला विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये कार्यकर्ता मेळावा आयोजित केला आहे. पनवेल निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मेळाव्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. नाईक भाजपात जाणार असल्याच्या चर्चा अनेक दिवसांपासून सुरू असून, मेळाव्यात या चर्चांना पूर्णविराम मिळणार की पक्षांतराचे संकेत दिले जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पनवेल महापालिकेमध्ये भाजपाने पूर्ण बहुमत मिळविले आहे. या विजयामुळे आमदार प्रशांत ठाकूर यांचे पक्षातील वजन वाढले आहे. ठाकूर पिता-पुत्रांच्या मेहनतीबरोबर भाजपाची लाट असल्यानेच एकहाती सत्ता मिळविता आली आहे. या निर्णयाचे राजकीय पडसाद नवी मुंबईच्या राजकारणावर उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक राष्ट्रवादीला रामराम ठोकून भाजपा किंवा शिवसेनेत जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेच्या ठाणेमधील नेत्यांचा विरोध होत असल्याने ते भाजपात प्रवेश करण्याचे निश्चित समजले जात आहे. याविषयी प्रसारमाध्यमांमधून वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतरही नाईक यांनी त्याचे समर्थनही केले नाही व खंडनही केले नाही. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही नाईक पक्षांतर करणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या; परंतु शेवटच्या क्षणी त्यांनी तो निर्णय बदलला होता. लोकसभा निवडणुकीतील संजीव नाईक यांचा व विधानसभा निवडणुकीतील स्वत: गणेश नाईक यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीमध्ये राहून दोघांचेही राजकीय पुनर्वसन होण्याची शक्यता नाही. भाजपात गेल्यास एखादे पद मिळण्याची व पुनर्वसन होण्याची शक्यता असल्याने पुन्हा एकदा पक्षांतराची चर्चा सुरू झाली आहे. ३० एप्रिलला विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये मेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यात नाईक काय भूमिका घेणार. पक्षांतराचे सूतोवाच केले जाणार की सुरू असलेल्या चर्चेला पूर्णविराम देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांची मते आजमावून महापौर निवडणुकीपूर्वी निर्णय घेतला जाण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.