नवी मुंबई : स्थायी समितीने रुग्णालयांची साफसफाई, फर्निचरसह औषध खरेदीच्या ९२ कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली. प्रस्तावांवर सेना नगरसेवक एकक़े. मढवी विरोध करणार असल्यामुळे ३० नोव्हेंबरची सभा रद्द केली व सोमवारच्या सभेचे आमंत्रण त्यांना दिलेच नाही. सचिवांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाविषयी लोकप्रतिनिधींमधील नाराजी अद्याप कायम असून, स्थायी समितीमध्येही त्याचे पडसाद उमटले. सोमवारी झालेल्या सभेमध्ये पॅथॉलॉजी साहित्य खरेदी, रुग्णालयांची यांत्रिक पद्धतीने साफसफाई, नेरूळ, ऐरोली व बेलापूर रुग्णालयांसाठी फर्निचर खरेदी, साफसफाईच्या कामास मुदतवाढ, रुग्णालयासाठी कपडे खरेदी व धुण्यासह कँटीनचा प्रस्ताव मंजुरीसाठी आला होता. तब्बल ९२ कोटी २२ लाख रुपयांच्या प्रस्तावास सर्वमताने मंजुरी देण्यात आली. रुग्णालयाची यांत्रिक पद्धतीने साफसफाई करण्याच्या प्रस्तावास काँगे्रस नगरसेविका रूपाली निशांत भगत यांनी आक्षेप घेतला. या ठेक्यामधील त्रुटी त्यांनी निदर्शनास आणून दिल्या. ठेकेदारास लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न झाला असल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना प्रशासनाची तारांबळ उडाली होती. सभागृह नेते जयवंत सुतार यांनी फर्निचर खरेदीसाठी दरकराराने साहित्य घेण्याचा ठराव यापूर्वी मंजूर केला असताना आता पुन्हा निविदा का मागविल्या, निविदा मागविताना ४ कोटी उलाढाल असल्याची अट का घातली, अशी विचारणा केली. निविदा कमिटीमध्ये तांत्रिकज्ञान असलेली व्यक्ती नसल्याविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली. आरोग्य समितीची विशेष सभा घेतली होती. त्याचे उत्तरही अद्याप दिले नसल्याचेही रवींद्र इथापे यांनी निदर्शनास आणून दिले. नवीन रुग्णालयांवर नावांची पाटी लावली नसल्याविषयी नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना नगरसेवक एम. के. मढवी यांना या सभेसाठीचे आमंत्रणच दिलेले नव्हते. त्यांनी याविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोग्य समितीच्या अनेक कामांमध्ये त्रुटी आहेत. याविषयी पुराव्यानिशी भांडाफोड करणार असल्यामुळे सचिवांनी सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरून मुद्दाम सभेची वेळ कळविली नाही, असा आरोप केला. ३० तारखेला सभा होणार होती, परंतु ती रद्द केली. फोनवरून विचारले असता सभा ८ तारखेच्या नंतर घेतली जाणार असल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात सोमवारी सभा ठेवली. परंतु सुधारित वेळेविषयी कळविले नाही. याविरोधात आवाज उठविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
आरोग्य विभागासाठी ९२ कोटींच्या प्रस्तावांना मंजुरी
By admin | Updated: December 8, 2015 01:01 IST