एपीएमसीमध्ये समस्यांचा ‘फळ’बाजार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 02:20 AM2018-04-17T02:20:16+5:302018-04-17T02:20:16+5:30

बाजार समितीच्या फळ मार्केटमधील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. गांजा व गुटख्याची विक्री पुन्हा सुरू झाली आहे. स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, अनधिकृत पार्किंगमुळे साफसफाई करण्यात अडसर निर्माण होऊ लागला आहे.

APMC 'problems' market of problems! | एपीएमसीमध्ये समस्यांचा ‘फळ’बाजार!

एपीएमसीमध्ये समस्यांचा ‘फळ’बाजार!

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : बाजार समितीच्या फळ मार्केटमधील समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालल्या आहेत. गांजा व गुटख्याची विक्री पुन्हा सुरू झाली आहे. स्वच्छतेचा प्रश्नही ऐरणीवर आला असून, अनधिकृत पार्किंगमुळे साफसफाई करण्यात अडसर निर्माण होऊ लागला आहे. राज्यातील सर्वांत अस्वच्छ मार्केट असल्याची टीका ग्राहकांसह व्यापारीही करू लागले आहेत.
आशिया खंडातील सर्वांत मोठी सहकारी बाजारपेठ म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची ओळख आहे. कांदा, मसाला, धान्य मार्केटमध्ये गेल्यानंतर आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट असल्याची जाणीव होते. या तीन मार्केटमध्ये स्वच्छता व्यवस्थित केली जात आहे. अवैध व्यवसायांना अभय दिले जात नाही. परंतु फळ मार्केटमध्ये मात्र परिस्थिती वाईट झाली आहे. राज्यातील सर्वांत अस्वच्छ व अवैध व्यवसाय असणारे मार्केट म्हणून फळ मार्केटची बदनामी होऊ लागली आहे. ९५ टक्के पानटपऱ्यांमध्ये गुटखा विकला जात आहे. गांजा व इतर अमलीपदार्थांचीही मोठ्या प्रमाणात विक्री सुरू आहे. येथील विद्युत सबस्टेशनचे दरवाजे तोडून त्यामध्ये गांजा ओढणाºयांनी अड्डा तयार केला आहे. याशिवाय एन विंगमधील मंदिर परिसरामध्ये गांजा ओढणाºयांची मैफील जमू लागली आहे. दिवसरात्र अमलीपदार्थांचे सेवन सुरू असूनही त्यांच्यावर कोणीच कारवाई करीत नाही. मार्केटमध्ये स्वच्छतेचा प्रश्नही गंभीर झाला आहे. भाजी व फळ मार्केटच्या मध्यभागी असलेल्या प्रसाधनगृहाच्या बाहेर मलनि:सारण वाहिनी नादुरुस्त झाली आहे. सर्व सांडपाणी रोडवर येत असून, परिसरामध्ये दुर्गंधी पसरत आहे.
आंबा हंगाम सुरू असल्यामुळे मार्केटमध्ये कचºयाचे प्रमाण वाढले आहे. कचरा साफ करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती केली आहे. परंतु मार्केटमधील अनधिकृत पार्किंगमुळे साफसफाई करणे अशक्य होऊ लागले आहे. माल खाली झाल्यानंतरही ट्रक व टेम्पो मार्केटमध्येच उभे केले जात आहेत. याशिवाय मोटारसायकल, कारही मार्केटमध्ये उभ्या केल्या जात असून, त्यामुळे वाहतूककोंडीची समस्या गंभीर झाली आहेच; शिवाय कचरा उचलणेही शक्य होत नाही. अस्वच्छतेमुळे सर्वत्र दुर्गंधी पसरू लागली आहे. खाद्यपदार्थ विक्रीच्या स्टॉलचालकांमुळेही अस्वच्छता वाढत आहे. कँटीनच्या बाजूला सर्वत्र पाणी साचलेले असून दुर्गंधी वाढू लागली आहे. मार्केटमध्ये खरेदीसाठी येणाºया नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. मार्केटमध्ये मोकळी जागाच शिल्लक नाही. जिथे जागा आहे तेथे मंदिर, माथाडी कामगारांसाठी खोली किंवा इतर बांधकामे केली आहेत. नवीन मार्केटचे काम रखडले असून बिगर गाळाधारकांसाठी शेड उभारल्यामुळे मोकळी जागाच संपली आहे. या सर्वांमुळे मार्केटमधील समस्या गंभीर झाल्या असून, प्रशासन या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देत नाही.

गांजा ओढणारांना अभय
निर्यात भवन इमारतीच्या कोपºयात विद्युत डीपीसाठी रूमचे बांधकाम केले आहे. इमारतीचे दरवाजे तोडले असून, आतमध्ये गांजा ओढणारे बसत आहेत. त्यांना विचारणा केली असता आम्ही हरिओमवाले असल्याचे सांगून बिनधास्तपणे गांजा ओढणे व मद्यपान करीत बसले. येथील ‘एन’ विंगजवळील मंदिराजवळ दिवसरात्र गांजा ओढणारे बसलेले असतात. गांजा ओढणारे व पुरविणाºयांवर कोणतीही कारवाई होत नाही.

गुटखा विक्री तेजीत
फळ मार्केटमध्ये गुटखा विक्री तेजीत आहे. भाजी व फळ मार्केटमध्ये ९५ टक्के पानटपºयांमध्ये गुटखा विकला जात आहे. खुलेआम सुरू असलेली विक्री थांबविण्याकडे प्रशासन दुर्लक्ष करत आहे. पोलीस व अन्न व औषध प्रशासनाची जबाबदारी असल्याचे कारण देऊन गुटखा विक्रीला अभय दिले जात आहे.

सर्वांत अस्वच्छ मार्केट
आंबा हंगाम सुरू असल्यामुळे मार्केटमध्ये मुंबई, ठाणेमधून मोठ्या प्रमाणात ग्राहक येत आहेत. मात्र मार्केटमधील अस्वच्छता पाहून नाराजी व्यक्त केली जात आहे. बाजार समितीच्या कामकाजाविषयीही नाराजी व्यक्त केली जात आहे. एवढे अस्वच्छ मार्केट राज्यात कुठेच नसल्याची टीका होऊ लागली आहे. मार्केटमध्ये कचरा व दुर्गंधी नाही अशी जागाच शिल्लक नाही.

फळ मार्केटमध्ये अवैध व्यवसाय कोणी करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मार्केटमधील वाहने येथे उभी असल्यामुळे साफसफाई करताना अडथळे येत असून यासाठी ठोस उपाययोजना करण्यात येतील. मार्केटमधील समस्या सोडविण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.
- सतीश सोनी,
मुख्य प्रशासक

Web Title: APMC 'problems' market of problems!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.