नवी मुंबईत कोविड टेस्टचा घोटाळा झाल्याचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:57 AM2020-11-27T00:57:01+5:302020-11-27T00:57:12+5:30

मराठा क्रांती मोर्चा : काही वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीचा अहवाल दाखवला जातोय निगेटिव्ह

Allegation of Covid Test scam in Navi Mumbai | नवी मुंबईत कोविड टेस्टचा घोटाळा झाल्याचा आरोप

नवी मुंबईत कोविड टेस्टचा घोटाळा झाल्याचा आरोप

Next

नवी मुंबई : नवी मुंबई शहरात कोविड पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची चाचणी न करता आयसीएमआरच्या वेबसाईटवर कोविड अहवाल निगेटिव्ह दाखविला जात आहे. तसेच काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह दाखविला असल्याचे सांगत टेस्ट किटचा घोटाळा झाल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अंकुश कदम यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केला.

नवी मुंबईसह ठाणे,पालघर जिल्ह्यात बाधा झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार या व्यक्तींनी चाचणी केलेली नसताना आयसीएमआरच्या वेबसाईटवर त्यांचे निगेटिव्ह अहवाल दाखविले जात असल्याचा आरोप कदम यांनी केला. या प्रकाराची शहानिशा करण्यासाठी कदम यांनी काही सहकाऱ्यांना चाचणीसाठी पाठविले होते. त्या व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबातील, गावी असलेले नातेवाईक तसेच मृत पावलेल्या व्यक्तींची नावे संपर्कात आलेल्या व्यक्ती म्हणून दिली होती. त्यांची चाचणी केली नसताना आयसीएमआरच्या वेबसाईटवर त्यांचे अहवाल निगेटिव्ह दाखविल्याचे कदम यांनी सांगितले. निगेटिव्ह अहवालातील अनेक व्यक्ती गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या मूळगावी असून काही व्यक्तींचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे.  टेस्ट किटचा घोटाळा तसेच टेस्टची आकडेवारी फुगविण्यासाठी सदर प्रकार घडत असल्याचा आरोप त्यांनी केला.

टेस्टच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याचा संशय - प्रवीण दरेकर

एकेकाळी वैभवशाली असलेली नवी मुंबई पालिका कोविडमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गैरव्यवहारांत बदनाम होत असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला. काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेल्या एका महिलेची चाचणी निगेटिव्ह दाखविली असून गावी असलेल्या नागरिकांची चाचणीही निगेटिव्ह दाखविली आहे. या सर्वांच्या घरातील व्यक्तींची टेस्टिंग केली नसतानादेखील अहवाल निगेटिव्ह दाखविले असल्याचे दरेकर म्हणाले. 

हा जनतेच्या जीवाशी चाललेला खेळ आहे. टेस्टिंग केल्याचे आकडे फुगवून दाखविण्यासाठी हे केले जात असून खोटे चित्र उभे करू नका तसेच वस्तुस्थिती लपवू नका हे आम्ही सरकारला पहिल्या दिवसापासून सांगतोय. जे टेस्टिंग केले नाही त्यावर तुम्ही पैसे खर्च करणार आहात. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा संशय दरेकर यांनी व्यक्त केला. कोविड काळात जनता त्रस्त झाली असताना माणुसकीला काळिमा फासणाऱ्या गोष्टी घडत असल्याचे दरेकर म्हणाले. 

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची भेट घेतली असून दोन दिवसांत याचा तपास करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री, आरोग्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करणार असून सूत्रधार लवकरच बाहेर येईल, असा विश्वास आहे. कारवाई झाली नाही तर आंदोलन केले जाणार असून विधिमंडळात राज्यातील कोव्हीड यंत्रणेचा पर्दाफाश करताना हा विषय प्राधान्याने घेणार असल्याचे दरेकर यांनी सांगितले.

टेस्ट न करता रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची तक्रार आली आहे. याबाबत तक्रारदाराने ज्या व्यक्तींची नावे दिली आहेत त्यानुसार तपास समितीच्या माध्यमातून तपास सुरू आहे. नवी मुंबई शहरात २३ तपासणी केंद्रे आहेत. एखाद्या ठिकाणी डेटाएण्ट्री करताना अशी बाब घडली असू शकते. परंतु सदर बाब गंभीर असून फक्त नावे प्राप्त झालेल्या नागरिकांपर्यंत तपास मर्यादित न ठेवता अधिक तपासणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे लवकरच ही बाब समोर येईल.
- अभिजित बांगर, आयुक्त, 
नवी मुंबई महानगरपालिका

Web Title: Allegation of Covid Test scam in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.