उरण : एलिफंटा लेणी पाहण्यासाठी आलेल्या महिला पर्यटकांना लेणी सुरक्षेसाठी असलेल्या सुरक्षारक्षकांकडूनच धक्काबुकी, शिवीगाळ करण्याचा प्रकार रविवारी घडला. यामुळे स्थानिक रहिवासी आणि व्यावसायिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.एलिफंटा बेटावरील प्राचीन लेणी पाहण्यासाठी दरवर्षी सुमारे १३ लाख देशी-विदेशी पर्यटक येतात. जागतिक वारसा लाभलेल्या लेणी आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी भारतीय पुरातत्त्व विभागाने सुरक्षा कंपनीची नियुक्ती केली आहे. सिक्युरिटी इंटलिजन सर्व्हिसेस (एसआयएस) दिल्ली येथील कंपनीला सुरक्षेचे काम सोपविले आहे. रविवारी एलिफंटा लेणी पाहण्यासाठी आलेल्या महिला पर्यटकांसह आलेल्या अन्य पर्यटकांना सुरक्षारक्षकांनी लेणी परिसरात क्षुल्लक कारणावरून धक्काबुकी केली. दोन्हीकडून बाचाबाचीला सुरुवात झाल्यानंतर, सुरक्षारक्षकांनी शिवीगाळ करीत लेणी परिसरातच पर्यटकांना अपमानित केले. पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकांनीच केलेल्या या प्रकारामुळे अन्य पर्यटकही भयभीत झाले.सुरक्षारक्षक पर्यटकांच्या सुरक्षततेकडे कानाडोळा करीत, जादा आर्थिक कमाईकडेच लक्ष पुरवित आहेत. त्यासाठी लेणी परिसरात स्थानिक गाइड्सना अटकाव करीत सुरक्षारक्षकच गाइडचे काम करीत असल्याचा आरोप स्थानिक व्यावसायिकांकडून केला जात आहे. अतिरिक्त कमाईसाठी सुरक्षारक्षक लेणी प्रवेशाची तिकि टे पुन्हा देशी-विदेशी पर्यटकांना विकत आहेत. या प्रकाराची चौकशी करून, संबंधितांवर कारवाई करण्याची मागणीही व्यावसायिकांकडून केली जात आहे.महिला पर्यटक आणि त्यांच्या सहकाºयांशी सुरक्षारक्षकांनी केलेली धक्काबुकी, शिवीगाळीचे एलिफंटा केव्हजचे केअर टेकर कैलास शिंदे यांनी समर्थन केले. मात्र, पतीसोबत आलेली पर्यटक महिला आणि त्यांचे सहकारीच सुरक्षारक्षकांबरोबरच हुज्जत घालीत होते. त्यामुळेच हा प्रकार घडल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
एलिफंटातील सुरक्षारक्षकांची पर्यटकाला धक्काबुक्की, तिकिटातही घोळ करीत असल्याचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2018 06:06 IST