- लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : अतिक्रमण विरोधी पथकाच्या कारवाईनंतरही त्या ठिकाणची परिस्थिती जशीच्या तशी, असल्याचे पाहायला मिळत आहे. यामुळे सिडको व महापालिका यांच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेच्या पारदर्शकतेबाबत संशय निर्माण झाला आहे.सिडको व पालिका अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे विविध सोयी-सुविधांसाठी राखीव असलेले भूखंड बळकावले जात आहेत. काही भूखंड भूमाफियांनी बळकावले असून, काही भूखंडांवर झोपड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक वर्षांपासून मोकळ्या स्थितीत असलेल्या या भूखंडांना वेळीच कुंपण न घातले गेल्यामुळे ते अतिक्रमणाच्या विळख्यात सापडलेले आहेत. अशा भूखंडावरील अतिक्रमणे हटवण्याला उशिरा का होईना; परंतु सिडकोने कारवाईला सुरुवात केली आहे. त्यानुसार शुक्रवारी कोपरखैरणेतील दोन भूखंडावरील अतिक्रमण हटवण्यात आले. एका भूखंडावर रेती व विटा साठवण्यात आल्या होत्या. शिवाय, एका कोपऱ्यात स्टेशनरीचे दुकान चालवले जात होते. तर दुसऱ्या भूखंडावर अनेक वर्षांपासून नर्सरी चालवली जात होती व त्यामागची जागा टँकर उभे करण्यासाठी वापरली जात होती. या दोन्ही भूखंडावर कारवाईकरिता मोठ्या प्रमाणात पोलिसांचे बळ पुरवण्यात आले होते. दोन्ही प्रशासनाकडून अशा कारवायांसाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत; परंतु कारवाईदरम्यान सदर ठिकाणचे अतिक्रमण पूर्णपणे हटवले जात नाही. यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाची पुढच्या कारवाईकडे पाठ फिरताच काही तासांतच त्या ठिकाणची परिस्थिती जशीच्या तशी पाहायला मिळत आहे. असाच प्रकार शुक्रवारी कोपरखैरणेत झालेल्या कारवाईदरम्यान घडला आहे. पेट्रोलपंपालगतच्या नर्सरीवर कारवाई करूनही दुसऱ्या दिवशी ती जशीच्या तशी पाहायला मिळत आहे. त्यामुळे गावठाणातील कारवाईदरम्यान जी आक्रमकता दिसते, तीच आक्रमकता मोकळ्या भूखंडावरील अतिक्रमणे हटवताना का दिसत नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. पोलिसांना प्रसिद्धीचे आमिषकारवाईपूर्वी कोपरखैरणे पोलीस ठाण्यात बंदोबस्तासंदर्भात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी उपस्थित पी. बी. पाटील व गणेश झिने या दोघा सिडको अधिकाऱ्यांनी नवीनच रुजू झालेले वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत कांबळे यांना प्रसिद्धीचे आमिष दाखवत खूश करण्याचा प्रयत्न केला. ‘आम्ही सर्व पत्रकारांना बोलवतो, त्यांना प्रेसनोटही पाठवतो, त्यात तुमचेही नाव लिहू, चांगली प्रसिद्धी मिळते’, अशा प्रकारची वाक्ये त्यांनी वापरली.