नवी मुंबई : याकूबच्या फाशीनंतर देशात सतर्कतेचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून कोपरखैरणे पोलिसांनी एका सिमकार्ड विक्रेत्यावर कारवाई केली़ ग्राहकांकडून योग्य कागदपत्रे न घेताच तो सिमकार्डची विक्री करीत होता. अजिंक्य पडवळ असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडून अशी १८० सिमकार्डे जप्त करण्यात आली आहेत.नवी मुंबईचे पोलीस आयुक्त प्रभात रंजन यांनी शनिवारी बैठक घेऊन सर्व पोलिसांना खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या. येत्या काळात गणेशोत्सव, दहीहंडी, दीपावली हे सण-उत्सव साजरे होणार आहेत. त्यावर दहशतीचे सावट असल्याने सर्व महत्त्वाच्या स्थळांवरील गैरहालचालींवरही लक्ष ठेवण्याच्या सूचना आयुक्त रंजन यांनी केल्या. या बैठकीला अपर आयुक्त विजय चव्हाण, सर्व उपायुक्त, साहाय्यक आयुक्त, पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यादरम्यान कोपरखैरणे पोलिसांनी रविवारी एका मोबाइल सिमकार्ड विक्रेत्यावर कारवाई केली. दहशती कृत्यांसाठी दहशतवाद्यांकडून बनावट सिमकार्डचा वापर होतो. ही सिमकार्ड कोणाचीही बनावट कागदपत्रे जमा करून घेतलेली असतात. त्यामुळे सिमकार्डची विक्री करताना संबंधिताची आवश्यक कागदपत्रे जमा करून घेणे गरजेचे असते. मात्र कोपरखैरणत रस्त्यालगत बाकडा टाकून सिमकार्ड विकऱ्या आयडिया कंपनीच्या सिमकार्ड विक्रेत्याकडून हलगर्जी होत होती. त्यामुळे पोलिसांनी अजिंक्यवर कारवाई करून त्याच्याकडील १८० सिमकार्डे जप्त केली. वरिष्ठ निरीक्षक सतीश गायकवाड यांनी ही माहिती दिली. तो आयडिया कंपनीचा अधिकृत एजंट आहे का, याचीही चौकशी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
विनापरवाना सिमकार्ड विक्रेत्यावर कारवाई
By admin | Updated: August 3, 2015 02:49 IST