पालिकेकडून जप्तीच्या मालाचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 11:34 PM2019-09-25T23:34:46+5:302019-09-25T23:34:48+5:30

माल देण्यास टाळाटाळ; कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राउंडमधील सावळागोंधळ उघड

Abduction of seized goods from the municipality | पालिकेकडून जप्तीच्या मालाचा अपहार

पालिकेकडून जप्तीच्या मालाचा अपहार

Next

- सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान जप्त केल्या जाणाऱ्या मालाचा अपहार होत असल्याचे उघड झाले आहे. गणेशोत्सवापूर्वी कोपरखैरणेत एका जत्रेतील साहित्य जमा करण्यात आले होते. मात्र संबंधिताने दंडाचे वीस हजार रुपये भरल्यानंतर देखील त्यांना सुमारे तीन लाखांचा त्यांचा मुद्देमाल परत देण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे त्यांनी डम्पिंग ग्राउंडमध्ये चौकशी केली असता, त्यांचा जप्त केलेला माल त्याठिकाणी नसल्याचे उघड झाले.

पालिकेच्या अतिक्रमण विरोधी मोहिमेबाबत सातत्याने संशय व्यक्त होत आहे. कारवाईमध्ये पारदर्शकता नसून पथकातील कर्मचारी व फेरीवाल्यांचे हितसंबंध असल्याचेही आरोप होत आहेत. त्यामुळेच अनेक ठिकाणचे रस्ते अनधिकृत फेरीवाल्यांनी व्यापलेले असतानाही त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचे दिसून येते. तर अनेकदा कारवाईपूर्वीच फेरीवाल्यांकडून रस्ते मोकळे केले जात असल्याने त्यांना कारवाईची पूर्वकल्पना मिळत असल्याचाही दाट संशय आहे. अशातच पालिकेकडून ज्यांचा माल जप्त केला जातो, त्या मालाचाही अपहार होत असल्याचे समोर आले आहे. कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राउंडमध्ये अशा प्रकारची घटना घडली असून त्याचा आर्थिक भुर्दंड संबंधिताला बसला आहे. गणेशोत्सवादरम्यान कोपरखैरणे सेक्टर ५ ते ८ दरम्यानच्या मैदानात एका मंडळाने समोरील मोकळ्या जागेत जत्रा भरवली होती. त्यानुसार मोठमोठे आकाश पाळणे व इतर सामानाची मांडणी होत असतानाच पालिकेच्या पथकाने त्यांच्यावर कारवाई केली होती. यावेळी जत्रेतील सामानापैकी सहा प्रकारच्या एकूण ३० लोखंडी वस्तू जप्त करण्यात आल्या होत्या. त्याची किंमत अंदाजे तीन लाख रुपये असल्याचे जत्रेच्या आयोजकांकडून सांगितले जात आहे. हे सामान परत मिळवण्यासाठी पालिकेकडून त्यांना २० हजार रुपयांचा दंड सांगण्यात आला. मात्र त्यांनी दंडाची रक्कम भरल्यानंतर देखील मागील दहा दिवसांपासून जप्तीचा मुद्देमाल परत देण्यास टाळाटाळ होत आहे. यामुळे त्यांनी कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राउंडमध्ये चौकशी केली असता, त्यांच्या जप्त केलेल्या मालाची नोंद आढळली. मात्र तो माल सापडत नसल्याचे त्यांना पालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. यावरून पालिकेकडून जप्तीच्या मालाचा अपहार होत असल्याचा दाट संशय व्यक्त होत आहे.

यापूर्वी देखील कोपरखैरणेतील डम्पिंग ग्राउंडमधून जप्तीच्या हातगाड्या विकल्या जात असल्याच्या प्रकारांना अनेकांनी वाचा फोडली होती. त्यानंतर डम्पिंग ग्राउंडवर सीसीटीव्ही बसवण्यात आले होते. मात्र मागील काही वर्षांपासून तिथले तीनही सीसीटीव्ही बंद असून ते जाणीवपूर्वक बंद पाडण्यात आल्याचे प्रत्यक्षात दिसून येत आहे. काही ठिकाणी सीसीटीव्हीच्या वायरी तोडण्यात आल्या आहेत, तर काही ठिकाणचे सीसीटीव्हीच दिसेनासे झाले आहेत. यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात सावळागोंधळ चालत असल्याचा आरोप होत आहे.
तर पथकातील कर्मचाºयांकडून सोयीनुसार दररोज रात्री जप्तीच्या मालाची वाटणी करून घरे भरली जात असल्याचाही आरोप नागरिकांकडून होत आहे. यापूर्वी त्याठिकाणी आग लागल्याची देखील घटना घडली होती. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांचे जप्तीचे साहित्य जळून खाक झाले होते. मात्र या आगीतून देखील संशयाचा धूर येत होता. अशातच समोर आलेल्या या प्रकारामुळे पालिका अधिकाºयांसह कर्मचाºयांच्या भूमिकेविषयी संशय व्यक्त होवू लागला आहे. यासंंदर्भात पालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्याशी संपर्क साधला असता, तो झाला नाही.

गणेशोत्सवादरम्यान मनोरंजनासाठी जत्रा भरवत असतानाच पालिकेने सुमारे तीन लाखांचे लोखंडी साहित्य जप्त केले होते. ते साहित्य अत्यंत महत्त्वाचे असल्याने ते परत मिळावे यासाठी वीस हजारांचा दंड भरला. परंतु दंड भरल्यानंतर पालिकेकडून साहित्य देण्यास टाळाटाळ होत आहे. अखेर डम्पिंग ग्राउंडमध्ये चौकशी केली असता, साहित्य त्याठिकाणी नसल्याचेच उघड झाले. पालिका अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून त्या मालाचा अपहार झाला असून त्याचा आपल्याला भुर्दंड सहन करावा लागत आहे.
- सिंड्रेला गोटूर,
जत्रा आयोजक

Web Title: Abduction of seized goods from the municipality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.