महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना कारवाई टाळण्याची संधी, लोक अदालतीत सहभागी होण्याचे आवाहन  

By योगेश पिंगळे | Published: December 6, 2023 04:20 PM2023-12-06T16:20:48+5:302023-12-06T16:21:50+5:30

या संधीचा फायदा घेण्याचे महावितरणच्या माध्यमातून वीज ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे.

A chance for Mahavitran delinquent customers to avoid action, appeal to participate in Lok Adalat | महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना कारवाई टाळण्याची संधी, लोक अदालतीत सहभागी होण्याचे आवाहन  

महावितरणच्या थकबाकीदार ग्राहकांना कारवाई टाळण्याची संधी, लोक अदालतीत सहभागी होण्याचे आवाहन  

नवी मुंबई : महावितरण वाशी मंडळातील कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित करण्यात आलेले वीज ग्राहक तसेच वीज बिलाबाबत वाद व वीज चोरीच्या न्यायालयात दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणांच्या थकबाकी व त्यावरील व्याज याचे तडजोडीने निपटारा करण्याची तसेच पुढील कायदेशीर कारवाई टाळण्याची संधी आहे. त्यासाठी या ग्राहकांना तालुका न्यायालय स्तरावर शनिवारी ०९ डिसेंबर २०२३ रोजी आयोजित लोक अदालतीत सहभागी व्हावे लागणार आहे. या संधीचा फायदा घेण्याचे महावितरणच्या माध्यमातून वीज ग्राहकांना आवाहन करण्यात आले आहे.

वाशी मंडळ कार्यक्षेत्रातील बेलापूर, पनवेल, व उरण येथील न्यायालयात ९ डिसेंबर २०२३ रोजी राष्ट्रीय लोक अदालत आयोजित होणार आहे. बेलापूर येथील न्यायालयात वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ५५०८ ग्राहकांचे तसेच वीज चोरीच्या २३५ ग्राहकांचे दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे तर पनवेल येथील न्यायालयात  वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या ३५४६ ग्राहकांचे तसेच वीज चोरीच्या २४० ग्राहकांचे दाखलपूर्व व प्रलंबित प्रकरणे तर उरण येथील न्यायालयात वीजपुरवठा खंडित करण्यात आलेल्या १४५४ ग्राहकांचे दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात आलेली आहे. वाशी मंडळातील संबंधित ग्राहकांना सकाळी ११ ते दुपारी २ दरम्यान लोक अदालतीत सहभागी होण्याबाबत न्यायालया मार्फत नोटीसा पाठवण्यात आल्या आहेत अशी माहिती वाशी मंडळाचे सहा.विधी अधिकारी श्री.राजीव वामन यांनी दिली आहे. नोटीस मिळाली नसेल तरीही या ग्राहकांना लोक अदालतीत सहभागी होऊन आपल्या प्रकरणांचा निपटारा करून घेता येईल. संबंधित ग्राहकांनी आपापल्या कार्यक्षेत्रातील तालुका न्यायालयात आयोजित लोक अदालतीत सहभागी होऊन या संधीचा लाभ घ्यावा व पुढील कायदेशीर कारवाई टाळावी असे आवाहन महावितरणच्या भांडूप परिमंडळाचे मुख्य अभियंता सुनिल काकडे व वाशी मंडळाचे अधीक्षक अभियंता सिंहाजिराव गायकवाड यांनी केले आहे.

Web Title: A chance for Mahavitran delinquent customers to avoid action, appeal to participate in Lok Adalat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.