अ‍ॅण्टिजन यादीत 7872 नावे बोगस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 11:17 PM2021-02-25T23:17:26+5:302021-02-25T23:17:36+5:30

कोविड चाचण्यात घोळ झाल्याच्या तक्रारी मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या.

7872 names bogus in antigen list | अ‍ॅण्टिजन यादीत 7872 नावे बोगस

अ‍ॅण्टिजन यादीत 7872 नावे बोगस

Next

नवी मुंबई : कोरोनाच्या काळात महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या अ‍ॅण्टिजन चाचण्यांच्या यादीत ७८७२ नावे बोगस असल्याचे स्पष्ट झाले आहे. चाचणी न करताच ही नावे आयसीएमआरच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. कोरोना चाचण्यासंदर्भातील तक्रारीची खातरजमा करण्यासाठी आयुक्त अभिजित बांगर यांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या अहवालात ही बाब स्पष्ट झाली आहे. केवळ संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही चूक झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. 

कोविड चाचण्यात घोळ झाल्याच्या तक्रारी मध्यंतरीच्या काळात आल्या होत्या. आयसीएमआरच्या संकेतस्थळावर अ‍ॅण्टिजन चाचण्या न करताच अनेकांची नावे प्रसिद्ध झाली होती. यासंदर्भात आलेल्या तक्रारींची खातरजमा करण्यासाठी आयुक्त बांगर यांनी तीन सदस्यांची समिती गठित केली होती. या समितीने गुरुवारी ११,५९१ पानांचा अहवाल आयुक्त बांगर यांना सादर केला आहे.

या अहवालात ७८७२ नावे कोणतीही चाचणी न करताच आयसीएमआरच्या पोर्टलवर प्रसिद्ध केल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे यात कोणत्याही प्रकारची आर्थिक नियमितता आढळून आलेली नाही. संबंधित अधिकाऱ्यांतील समन्वयाचा अभाव व निष्काळजीपणा या प्रकाराला कारणीभूत असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.  या समितीने महापालिकेने खरेदी केलेल्या अ‍ॅण्टिजन टेस्ट किट्स व प्रत्यक्षात वापरण्यात आलेल्या किट्स यांची तपासणी करून हा अहवाल तयार केला आहे. 

तसेच ज्या अ‍ॅण्टिजन टेस्ट करून घेतलेल्या एक लाख ५१ हजार ९५६ नागरिकांना महापालिकेच्या कॉल सेंटरमार्फत संपर्क साधण्यात आला. यापैकी १५९७ नागरिकांनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे चाचणी केलेल्या  १८४५ कुटुंबांना समितीने प्रत्यक्ष भेट देऊन चोकशी केली. यापैकी केवळ दोन नागरिकांनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले.  

याशिवाय समितीने संबंधित नोडल अधिकारी, डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांचा जबाब नोंदवून घेतला.     परंतु नोंदणीच्या सदोष कार्यपद्धतीमुळे आयसीएमआरच्या संकेतस्थळावर ७८७२ नावांची अतिरिक्त नोंद झाल्याचे अहवालात  स्पष्ट करण्यात आले आहे.  एकूणच कोरोना चाचणीचे क्षेत्रिय स्तरावर चोख काम झाले असले तरी आयसीएमआर पोर्टलवर चुकीची माहिती प्रसिद्ध करण्यात आल्याचा निष्कर्ष समितीने काढला आहे.   तसेच  ज्या १५९७ व्यक्तींनी चाचणी झाली नसल्याचे सांगितले आहे, त्याबाबत पुन्हा शहनिशा करणे आवश्यक असल्याचे समितीने या अहवालत नमूद केले आहे.  

Web Title: 7872 names bogus in antigen list

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.