नवी मुंबई :- आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या अथक प्रयत्नांतून बेलापूर मतदार संघाच्या विकास कामांसाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजने अंतर्गत 4.50 कोटी मंजूर निधी केला झाला आहे. शहरी भागात गरीब, वंचितावर लक्ष केंद्रित करून त्यांच्या जीवनाचा दर्जा उंचावण्यासाठी शहरी भागात मुलभूत नागरी सुविधा पुरविण्यासाठी हा उपक्रम आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाने बेलापूर मतदार संघाकरिता रु. 4.50 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून दिला आहे. या करिता म्हात्रे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
या निधीमुळे नवी मुंबई शहरातील विकासकामांना गती मिळणार असून या योजनेअंतर्गत पाण्याचा निचरा करण्यासाठी सांडपाणी व्यवस्थापन, सरंक्षण भिंत, ब्रिज, समाजमंदिर, उद्यान, नागरी आरोग्य केंद्र, बालवाडी, जलकुंभ उभारणे, व्यायामशाळा अशा अनेक विकास कामांमुळे नागरिकांना पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत. त्यामुळे सार्वजनिक सेवांमध्ये सुधारणा होऊन रोजगारनिर्मिती होईल. तसेच गरीब आणि सुविधाहीन नागरिकांना लाभ मिळेल असा विश्वास आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केला.ही कामे करणार
उपलब्ध निधीच्या माध्यमातून तुर्भे विभागातील तुर्भे स्टोअरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडच्या दोन्ही बाजूची गटारे नव्याने बांधणे, सीबीडी सेक्टर – 8, रमाबाई आंबेडकर नगर येथे सामाजिक मंदिर बांधणे व उद्यान विकसित करणे, नेरूळ येथील शिवाजी नगर येथे नागरी आरोग्य केंद्र उभारणे, नेरूळ गांधी नगर येथे बालवाडी उभारणे, तसेच इंद्रानगर येथे समाज मंदिर उभारणे याकरिता प्रत्येकी रु. 50 लाख निधी उपलब्ध केला असून नेरूळ येथील गांधीनगर येथे जलकुंभ उभारणे व तुर्भे हनुमान नगर येथे व्यायाम शाळा या करिता प्रत्येकी रु. 25 लाख निधी मंजूर केला आहे.
तसेच नागरिकांचा गरजा आणि अपेक्षा, सार्जनिक सेवांमधील सुधारणा, प्रमुख आर्थिक घडामोडींवर प्रभाव, रोजगारनिर्मिती, गरीब आणि सुविधाहीन नागरीकांना लाभ कमी खर्चात जास्तीत जास्त सुविधांची निर्मिती होणार आहेत.