स्थायी समितीत २३६ कोटींची कामे मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 11:37 PM2019-09-19T23:37:08+5:302019-09-19T23:37:21+5:30

आचारसंहितेचा फटका विकासकामांना बसू नये, यासाठी महानगरपालिकेने एक आठवड्यामध्ये स्थायी समितीच्या दोन सभा आयोजित केल्या होत्या.

2 crore works were approved in Standing Committee | स्थायी समितीत २३६ कोटींची कामे मंजूर

स्थायी समितीत २३६ कोटींची कामे मंजूर

Next

नवी मुंबई : आचारसंहितेचा फटका विकासकामांना बसू नये, यासाठी महानगरपालिकेने एक आठवड्यामध्ये स्थायी समितीच्या दोन सभा आयोजित केल्या होत्या. दोन दिवसांमध्ये तब्बल २३६ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे. गुरुवारी १०२ पैकी ९९ विषय काहीही चर्चा न करताच मंजूर करण्यात आले.
विधानसभा निवडणुका जवळ आल्यापासून नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये विकासकामांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्याची घाई सुरू झाली आहे. सर्वसाधारण सभा व स्थायी समितीमध्येही जास्तीत जास्त प्रस्ताव मार्गी लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. मंगळवारी झालेल्या सभेमध्ये ७१ कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली होती. त्या वेळी अनेक नगरसेवकांनी प्रभागांमधील कामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. निवडणुकीपूर्वी प्रस्ताव मंजूर झाले पाहिजेत, अशी भूमिका मांडली होती. त्यानंतर स्थायी समिती सभापती नवीन गवते, सभागृहनेते रवींद्र इथापे, आयुक्त अण्णासाहेब मिसाळ व प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक आयुक्तांच्या दालनामध्ये घेण्यात आली. ज्या निविदा पूर्ण झाल्या आहेत, असे सर्व प्रस्ताव आचारसंहितेपूर्वी मंजूर करण्यावर चर्चा करण्यात आली. आयुक्तांनी सर्व विभागांना त्याविषयी सूचना दिल्या व गुरुवारी स्थायी समितीची विशेष सभा घेण्याचे निश्चित करण्यात आले. या सभेसाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम दोन दिवस युद्धपातळीवर करण्यात आले. सभा सुरू झाली तेव्हा ७२ विषय मंजुरीसाठी ठेवण्यात आले. यानंतर आयत्या वेळी पुन्हा ३० विषय मंजुरीसाठी मांडण्यात आले. १ ते ७२ पर्यंतचे विषय एकाच वेळी मंजुरीसाठी ठेवण्यात आले व कोणतीही चर्चा न करताच ते मंजूर करण्यात आले. या वर्षामध्ये पहिल्यांदाच चर्चा न होता एवढे विषय मंजूर करण्यात आले.
स्थायी समितीमध्ये कंडोमिनियम अंतर्गत विकासकामे करण्याच्या प्रस्तावावर नगरसेवकांनी चर्चा केली. कोपरखैरणेमधील कामे करण्याचा प्रस्ताव आणल्याविषयी काही नगरसेवकांनी आभार मानले; परंतु हा प्रस्ताव अपूर्ण असून त्यामुळे सर्व कोपरखैरणे नोडमधील कामे होणार नसल्याचे अ‍ॅड. भारती पाटील यांनी निदर्शनास आणून दिले. शाळा दुरुस्तीच्या प्रस्तावावरून ज्ञानेश्वर सुतार यांनी त्यांच्या प्रभागामधील शाळेची दुरुस्ती होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक सुनील पाटील यांनी त्यांच्या प्रभागातील प्रस्ताव मार्गी लागत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. फक्त दोनच विषयांवर चर्चा झाली. यानंतर आयत्या वेळच्या प्रस्तावांची विषयपत्रिका पटलावर आली नसल्यामुळे सभा सुरू ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांचे आभार मानायचे काम सुरू करण्यात आले.
>ंसभागृहात खडाजंगी
स्थायी समिती बैठकीमध्ये सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी प्रशासनाचे आभार मानले. अधिकाºयांनी चांगले सहकार्य केल्यामुळे जास्तीत जास्त प्रस्ताव पटलावर आणल्याचे स्पष्ट केले. या वेळी रंगनाथ औटी यांनी त्यांच्या भाषणास आक्षेप घेतला. आमच्या प्रभागातील प्रस्ताव आले नसल्याचे स्पष्ट केले. नगरसेविका सरोज पाटील यांच्याशीही शाब्दिक खडाजंगी झाले. अखेर सभापतींनी मध्यस्थी करून सर्वांना शांत केले.
>रात्री १२ पर्यंत सुरू होते काम
मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीनंतर गुरुवारी पुन्हा विशेष स्थायी समिती बैठक घेण्याचे निश्चित करण्यात आले. यासाठी दोन दिवस सर्व विभागाचे अधिकारी रात्रंदिवस काम करत होते. बुधवारी रात्री जवळपास १२ वाजेपर्यंत प्रस्ताव तयार करणे व तपासण्याचे काम सुरू होते. अनेक वरिष्ठ अधिकारीही रात्री १० नंतरही मुख्यालयात ठाण मांडून बसले होते.
>भेटल्याशिवाय प्रस्ताव मंजूर नाही
शिवसेना नगरसेवक रंगनाथ औटी यांनी सभागृहात गंभीर आरोप केले. आमची कामे मुद्दाम अडविली जात असल्याचे सांगितले. सभागृहात प्रस्ताव येण्यापूर्वी यांना फोन करा, त्यांना फोन करा, असे सुरू असते. भेटल्याशिवाय प्रस्ताव मंजूर केले जात नाहीत, असा आरोप त्यांनी या वेळी केला.
>सर्व नगरसेवकांच्या प्रभागांमधील कामे करण्यास आम्ही प्राधान्य देत असतो. विशेष स्थायी समितीमध्ये बेलापूर ते दिघापर्यंत शहरातील विकासकामांच्या अनेक प्रस्तावांना मंजुरी देता आली याचे समाधान आहे.
- नवीन गवते,
सभापती, स्थायी समिती
मंगळवारी झालेल्या सभेमध्ये विकासकामे होत नसल्याबद्दल काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली होती. गुरुवारच्या सभेमध्ये सर्व शहरातील विविध प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवण्यात आले. प्रशासनानेही चांगले सहकार्य केले यासाठी त्यांचेही आभार.
- रवींद्र इथापे,
सभागृह नेते
आयकर कॉलनीमधील मलनि:सारण वाहिन्या खराब झाल्या आहेत. दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. तो प्रस्ताव लवकर मार्गी लागला पाहिजे. या सभेत तो आला पाहिजे होता.
- सरोज पाटील,
नगरसेविका प्रभाग १०१
.स्थायी समितीमध्ये सर्व शहरातील प्रस्ताव आले; परंतु प्रभाग ९२ मधील विकासकामांचे प्रस्ताव आलेले नाहीत. आम्ही महापालिका क्षेत्रात राहत नाही का, असा प्रश्न निर्माण होत आहे.
- सुनील पाटील,
नगरसेवक,
प्रभाग ९२

Web Title: 2 crore works were approved in Standing Committee

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.