वैभव गायकर, पनवेलरेल्वेच्या वाढत्या प्रवासी संख्येचा आणि विस्ताराचा विचार करता अत्यंत महत्त्वाचे मानल्या जाणाऱ्या पनवेल टर्मिनसच्या कामाचा शुभारंभ रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते सोमवारी करण्यात आला. यामुळे येत्या तीन वर्षांत उपनगरीय, तसेच पनवेल, नवी मुंबई भागातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. रेल्वे अर्थसंकल्पात महानगरांच्या आसपास नवीन टर्मिनस विकसित करून तेथून लांब पल्ल्याच्या गाड्या सोडण्याची घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली होती. त्यानंतर शहराची वाढती गरज लक्षात घेऊन मध्य आणि पश्चिम रेल्वे यांनी अशा तीन टर्मिनसचा प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला होता. यात पनवेल, ठाकुर्ली आणि वसई या स्थानकांचा समावेश होता. परळसह २०१२-१३ मध्ये मंजूर झालेल्या पनवेल टर्मिनसचे काम तातडीने पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला असून यासाठी १५४ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सिडको आणि रेल्वे हा खर्च संयुक्तरीत्या करणार आहे. टर्मिनसवर ३ प्लॅटफॉर्म, ७ छोटे पूल, नवीन पनवेलकडे जाणाऱ्या मार्गावर भुयारी मार्ग, पार्किंगकरिता डेकस्लॅबवर स्वतंत्र जागा राहील. प्रकल्पांतर्गत पनवेल-कळंबोली दरम्यान तिसरी लाइन सुरू करण्यात येणार आहे. कळंबोली स्टेशन व मालगाडी विभागासाठी स्वतंत्र सुविधा असेल. त्याअंतर्गत ४ नंबर वॉशिंग पीट लाइन, पादचारी पथाचे बांधकाम व मेंटेनन्स सुविधा ही कामे याअंतर्गत केली जाणार आहेत.
पनवेल टर्मिनससाठी १५४ कोटींचा खर्च
By admin | Updated: June 3, 2016 02:07 IST