दिवाळीनिमित्त शहरात १२५ टन झेंडूची आवक; शेतकरी स्वत:च विकताहेत फुले , १०० ते १५० रुपये भाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2020 12:14 AM2020-11-14T00:14:53+5:302020-11-14T00:15:04+5:30

पुणे जिल्ह्यातून सर्वाधिक माल

125 tons of marigold arrives in the city on the occasion of Diwali | दिवाळीनिमित्त शहरात १२५ टन झेंडूची आवक; शेतकरी स्वत:च विकताहेत फुले , १०० ते १५० रुपये भाव

दिवाळीनिमित्त शहरात १२५ टन झेंडूची आवक; शेतकरी स्वत:च विकताहेत फुले , १०० ते १५० रुपये भाव

Next

नवी मुंबई : दिवाळीमुळे फुलांना मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये जवळपास १२५ टन पिवळ्या व केशरी रंगाच्या फुलांची आवक झाली आहे. वाशी, नेरूळसह अनेक ठिकाणी शेतकरी स्वत:च फुलांची विक्री करत असून १०० ते १५० रुपये किलो दराने बाजारभाव मिळू लागला आहे. 

दसरा व दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलांना मागणी वाढत असते. पुणे, सातारा व इतर ठिकाणांवरून मोठ्या प्रमाणात शेतकरी फुले विक्रीसाठी मुंबईमधील फूल बाजारामध्ये पाठवत असतात. परंतु मागील काही वर्षांत ओळख नसल्यास शेतकऱ्यांची लुबाडणूक झाल्याच्या किंवा कमी दराने फुलांची खरेदी केली जात असल्याच्या घटना समोर आल्या होत्या. यामुळे पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव, खेड, मंचर परिसरातील शेतकरी स्वत:च पदपथावर बसून फुलांची विक्री करत आहेत. यामुळे मध्यस्थांची साखळी कमी होऊन चांगला बाजारभाव मिळतो. ग्राहकांनाही योग्य दरात फुले उपलब्ध होत असतात. 

नवी मुंबईमध्ये ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे, वाशी, नेरूळ ते बेलापूरपर्यंत पदपथ, चौक, पुलाखाली व इतर ठिकाणी शेतकऱ्यांनी विक्री सुरू केली आहे. महानगरपालिका प्रशासनही या शेतकऱ्यांना विक्रीसाठी सहकार्य करत असते. विक्रेत्यांवर कारवाई केली जात नाही. यामुळे थेट फुलांची विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येतही वाढ होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांव्यतिरिक्त नियमित फूल विक्रेतेही प्रत्येक मंडई व चौकामध्ये दुकाने टाकून विक्री करत आहेत. दिवाळीपर्यंत जवळपास १२५ टन फुलांची विक्री होईल, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. पिवळ्या व केशरी रंगाच्या झेंडूची १०० ते १५० रुपये किलो दराने विक्री होत आहे. फुलांच्या दर्जाप्रमाणे बाजारभाव मिळत आहे. फुलांसह तयार केलेल्या हारांनाही मागणी आहे. ५० रुपयांपासून ते १०० व त्याहीपेक्षा जास्त किमतीला हारांची विक्री केली जात आहे.

विशेष शेतकरी बाजार उपलब्ध व्हावेत

नवी मुंबईमध्ये थेट शेतकरी फुलांची विक्री करण्यासाठी येण्याचे प्रमाण वाढत आहे. जागा मिळेल तेथे  शेतकरी फुलांची विक्री करत असतात. दसरा व दिवाळीमध्ये महानगरपालिका प्रशासनाने योग्य नियोजन करून शेतकरी बाजार भरवले तर शेतकऱ्यांना मोठी बाजारपेठ उपलब्ध होईल. मध्यस्थांची संख्या कमी होऊन शेतकऱ्यांना चांगला बाजारभाव मिळून ग्राहकांनाही कमी दरामध्ये फुले उपलब्ध होऊ शकतात.

Web Title: 125 tons of marigold arrives in the city on the occasion of Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Diwaliदिवाळी