पाटणा : बिहारच्या तरुणांना आता भाषणबाजी नको असून त्यांना त्यांचे भविष्य घडवण्यासाठी रोजगार हवा आहे, अशा शब्दांत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी तरुणांच्या रोजगारासंबंधी चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर निशाणा साधला. युवक काँग्रेसच्या वतीने येथे आयोजित करण्यात महारोजगार मेळाव्यात ते बोलत होते.
काँग्रेस खासदार राहुल गांधी म्हणाले की, सत्ताधारी भाजप आणि राज्य सरकारने रोजगाराच्या नावावर फक्त आश्वासने दिली, पण रोजगार देण्यासाठी कोणतीही हालचाल केली नाही. बेरोजगारीमुळे लाखो तरुणांना बिहारमधून स्थलांतर करावे लागत आहे. पण, त्यांना खरे म्हणजे स्थानिक स्तरावरच रोजगाराच्या संधी द्यायला हव्यात. आम्ही मात्र यासाठी वचनबद्ध आहोत.
दरम्यान, या महारोजगार मेळाव्यात हजारो तरुण-तरुणी उपस्थित होते. तरुणांची इतक्या मोठ्या संख्येने उपस्थिती आत्मविश्वास आणि बदलाची गरज दाखवणारा निर्णायक टप्पा असल्याचे यावेळी राहुल गांधी म्हणाले. तसेच काँग्रेस व इंडिया आघाडीच्या वतीने तरुणांठी रोजगार, कौशल्यविकास आणि उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यावर भर देण्यात येईल, असे आश्वासनही दिले. दरम्यान, बिहार सरकारने पाच वर्षांत एक कोटी नोकऱ्या देण्याची घोषणा केली आहे. राहुल गांधींनी मात्र हा निवडणुकीआधीचा खोटा वादा असून त्याची अंमलबजावणी होणार नाही, अशी टीका केली आहे.